कुणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घ्या! – देवेंद्र फडणवीस

कुणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घ्या! – देवेंद्र फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संवादसेतूच्या माध्यमातून सुमारे  ३१ हजार कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुणीही उपाशी झोपणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
सुमारे ५०० मंडळांमध्ये आता भाजपाचे सेवाकार्य सुरू झाले आहे. ५०० कम्युनिटी किचनच्या माध्यमातून २ लाख लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय, जे घरी अन्न बनवू शकतात, अशांकडे तेल, तिखट, मीठ, धान्य अशी किट उपलब्ध करून दिली जात आहे. पालघर, सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील स्थलांतरितांना तेथेच थांबवून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरजूंना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. ग्रामीण भागात चारा तसेच शेतकर्‍यांना खत-बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजच्या या दोन संवाद सेतूंमध्ये भाजपाचे सर्व शक्तिकेंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह प्रमुख नेते यात सहभागी झाले होते आणि त्यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कोरोना संसर्गाविषयीची जागतिक स्थिती, त्याचा संपूर्ण जग करीत असलेला मुकाबला, भारताने त्याविरोधात छेडलेले युद्ध याची तपशीलवार माहिती देतानाच कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका आणि आपली जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेले निर्णय, मोफत धान्य, शेतकर्‍यांसाठी पॅकेज, सर्वप्रकारच्या फाईलिंगला तीन महिने देण्यात आलेली मुदतवाढ असे सर्व निर्णय तळागाळापर्यंत पोहोचविण्याची आणि त्याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर आहे. कुठेही गर्दी होणार नाही, याचे भान राखत आणि स्वत:चीही काळजी घेत, कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पंतप्रधान निधीत सुद्धा कार्यकर्त्यांनी शक्य तेवढे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना यावेळी त्यांनी उत्तरेही दिली.
First Published on: March 30, 2020 9:21 PM
Exit mobile version