बेस्टच्या कंत्राटी चालकांचे मोफत प्रवासासाठी आंदोलन; प्रवाशांना फटका

बेस्टच्या कंत्राटी चालकांचे मोफत प्रवासासाठी आंदोलन; प्रवाशांना फटका

मुंबई: बेस्ट परिवहन विभागात कंत्राटी बस चालविणाऱ्या बस चालकांकडून उपक्रमाने तिकीट भाडे आकारण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ शिवाजी नगर बस डेपोमधील कंत्राटी बस चालकांनी शुक्रवारी अचानक आंदोलन सुरू केले. त्यामुळे बस डेपोमधून बसगाड्या बाहेर न पडल्याने बस प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. मात्र बेस्ट प्रशासन व कंत्राटी बस चालक यांच्यात मध्यस्थी होऊन समाधानकारक तोडगा काढण्याचा निर्णय झाल्यानंतर बस चालकांनी आपले आंदोलन मागे घेतले. त्यामुळे या डेपोमधील खोळंबलेल्या बस गाड्या डेपोबाहेर पडून रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.

बेस्ट उपक्रमाने प्रवासी संख्या वाढविण्यासाठी कंत्राटी बसगाड्या रस्त्यावर आणल्या. मात्र या बसगाड्यांच्या चालकांकडून बेस्टने इतर प्रवाशांप्रमाणे तिकीट भाडे घेण्यास सुरुवात केल्याने या बस चालकांनी तीव्र संताप व्यक्त करीत शिवाजी नगर बस डेपो येथे सकाळपासूनच आंदोलन सुरू केले. त्यामुळे या डेपोमधील जवळजवळ १०० बसगाड्या रस्त्यावर न धावता डेपोमध्येच अडकून पडल्या. परिणामी या बसगाडयांमधून नियमित प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे हाल झाले.

मात्र सकाळी १० पर्यँत बेस्ट प्रशासन व आंदोलन करणारे कंत्राटी बस चालक यांच्यात समाधानकारक चर्चा होऊन तोडगा काढण्याचे ठरले व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी, कंत्राटी बस चालकांच्या इतर काही प्रलंबित मागण्याबाबतही तोडगा काढण्याचे ठरल्याने व आंदोलन वेळीच मागे घेण्यात आल्यानंतर बसगाड्या रस्त्यावर धावू लागल्या आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.


हेही वाचा : मावळ मतदार संघात पार्थ पवार अॅक्टिव्ह मोडमध्ये, गणेश मंडळाच्या भेटीगाठी सुरू


 

First Published on: September 2, 2022 10:41 PM
Exit mobile version