खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देत प्रवाशांना लूटले

खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देत प्रवाशांना लूटले

(फोटो प्रातिनिधिक आहे)

रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा लूट केल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. बऱ्यादा प्रवासी झोपलेले असताना त्यांची बॅग, मोबाईल या गोष्टी चोरल्या जातात. मात्र आता लूट करण्यासाठी एक वेगळी शक्कल लढवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावरुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना लुटल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांना लुटणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका टोळीला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. विक्रेते असल्याचे भासवत खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांचा विश्वास संपादन करुन ही टोळी लूट करत होती. या आरोपींना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मुंबईतून कोकणात जाताना बरेच प्रवासी एक्सप्रेसमध्ये येणारे खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. याचाच फायदा घेऊन लूट करणाऱ्या टोळीने प्रवाशांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देण्याची एक नवीन शक्कल लढवली. लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांशी जवळीक साधून बिस्कीट, थंड पेय, जेवण आणि चहा या खाद्यपदार्थांमधून गुंगीचे औषध मिसळून प्रवाशांना द्यायचे. त्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्याकडील किंमती वस्तू लंपास करायचे. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या आरोपींनी व्यापारी असल्याचे भासवत मत्स्यगंधा एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना लुटले असल्याचे समोर आले.

या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना लूटले

या टोळीने उत्तर प्रदेश, बिहार, कोकणमार्गे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या ठिकाणी जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा विश्वास संपादन करुन ही टोळी लूट करत होते.

पाच लाखांची लूट

या प्रकरणामध्ये आरोपींनी कल्याण स्थानकातून रेल्वे तिकीट काढल्याचे समोर आले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताना हे आरोपी एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी लॉजवर जाऊन तपास केल्यानंतर त्या आरोपींचा मोबाईल नंबर आणि त्यावरुन मूळ पत्ता सापडला. हे आरोपी पश्चिम बंगालमधून आल्याचे समोर आले. बसारत नूर हुसेन (५०), मोहमद साफी (३५) अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ५ लाख ७७ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेता.

आरोपींना न्यायालयीन कोठडी

या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात तीन, कल्याण रेल्वे पोलिसांत तीन आणि रत्नागिरी पोलीस ठाण्यात एक असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींना २१ सप्टेंबर पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published on: September 18, 2018 10:45 AM
Exit mobile version