भाग्यश्री बानायत : भाग्यात आलेला लढवय्या बाणा

भाग्यश्री बानायत : भाग्यात आलेला लढवय्या बाणा

सन २०१२ च्या बॅचची भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्रातील मी पहिली महिला अधिकारी. हा प्रवास इतका सोपा नव्हता. असंख्य आव्हाने आली. वडिलांच्या निधनानंतर करावा लागलेला संघर्ष, एक विद्यार्थी, गृहीणी, नोकरदार महिला आणि एक स्त्री म्हणून बजवाव्या लागलेल्या भूमिकांमुळे मी आयुष्यात खूप काही शिकले अन कदाचित यातूनच आज माझ्या कामातही तो कणखरपणा दिसून येतो. वडिलांना अपेक्षित यश तर मिळाले पण हे यश पाहण्यासाठी ते आमच्यात नाहीत याचे दुःख कायम आहे& नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत आपल्या भावना व्यक्त करीत होत्या..जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी ते आयएएस अधिकारी असा बानायत यांचा प्रेरणादायी प्रवास.. खास ‘आपलं महानगर’च्या वाचकांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त..

भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, मी मूळची अमरावतीची. माझे आई वडील शिक्षक. शालेय शिक्षण अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. तर मोर्शी येथील महाविद्यालयातुन बीएस्सी केलं. आई तुळसाबाई, वडील भीमराव हे दोघेही शिक्षक असल्याने घरी शैक्षणिक वातावरण होतं. त्यामुळे बीएस्सी नंतर बीएडचे शिक्षण घेतले. परंतु मी प्रशासकीय सेवेत जावं ही माझ्या वडिलांचीच इच्छा होती. वडिलांकडूनच स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर मी स्पर्धा परिक्षेच्या तयारीला सुरूवात केली. दुर्देवाने वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले.२००९मध्ये मी एमपीएससी परिक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम आले. २०१२ च्या बॅचमधील मी एकमेव महाराष्ट्रीयन महिला आयएएस अधिकारी बनले. मी जेव्हा प्रशासकीय परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली तेव्हा वडिलांनी युपीएसएसी परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळख करून दिली. एमपीएससी परीक्षा चांगल्या रँकिंगने उत्तीर्ण झाल्यानंतर मला युपीएससी परिक्षा देण्याबाबत सुचवण्यात आले आणि खरी सुरूवात इथूनच झाली. खरं म्हणजे त्यावेळी ग्रामीण भागातील वातावरण जर आपण पाहिलं तर आजही मुलींबाबत म्हणजे मुलींनी खुप शिकावं अशी मानसिकता नव्हती.

तरूण मुलगी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडत असतांना समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो हे आपणांस माहिती आहे. तिने एक स्त्री म्हणूनच जगावं असं सर्वसाधारण समाजाची मानसिकता असते. पण माझ्या वडीलांनी जाणीवपूर्वक मला या वातावरणापासून दूर ठेवले. मुलगी म्हणून आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. तू काहीतरी उत्तम करू शकते ही शिकवण वडीलांनी दिली म्हणूनच मी आज या पदापर्यंत पोहचू शकले. म्हणूनच आजही मी माझ्या नावापुढे माहेरचे आडनाव लावते. हा त्यांचा सन्मान मी मानते. माझ्या वडिलांनी कधीच मुल आणि मुलींमध्ये भेदभाव केला नाही. मला आठवते माझ्या जन्मानंतर आजूबाजूच्या लोकांनी घरच्यांना सांगितले की, मुलगा झाला असता तर वंशाला वारस मिळाला असता. तेव्हा वडील म्हणाले, माझा वारस ही होईल. आज माझे हे यश माझ्या वडीलांनी पहायला हवे होते. अर्थात हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. या मार्गात अनेक आव्हाने आले. संघर्ष करावा लागला.

वडीलांचे निधन झाले तेव्हाचा तो प्रसंग. वडीलांचे निधन झाले त्यावेळी आई रूग्णालयात कोमात होती. वडीलांच्या निधनाचे वृत्त ऐकून तिची तब्येत आणखी बिघडली. एकीकडे आई आजारी तर दुसरीकडे घरातील कर्ता पुरूष गेला. काही नातेवाईकांनी वडीलांची पेन्शन मला मिळू नये याकरीता प्रयत्न सुरू केले. खरं म्हणजे अशा दुर्दैवी परिस्थितीत जवळच्या नातेवाईकांनी साथ द्यायला हवी होती. पण तसं न करता प्रॉपर्टीवरून वडिलांच्या मृत्यूनंतर विसाव्या दिवशी आईसह कोर्टात हजर रहावे लागले. त्यातून पुढील संघर्षाची जाणीव झाली. आर्थिक दृष्टीने सक्षम व्हायचे ठरवले. नातेवाईकांनी शेतीच्या कागदपत्रावरही माझ्या खोटया सह्या करत शेतजमीनीवरचा माझा हक्कही हिरावण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मला अनेक आघाड्यांवर काम करावे लागले. मी विद्यार्थीनीही होते. घरकाम करणारी गृहीणीही होते. घर चालवणारी एक कर्त्या स्त्रीच्या भूमिकेतून जातांना आईचा सांभाळही करत अन नोकरीही करत होते. एकाचवेळी सगळया आघाडयांवर मी लढत होते. तेव्हा मोशीहून मी अमरावतीला रोज ये-जा करत. हा काळ आयुष्य कसं असते हे शिकवून गेला.

पुढे प्रशासनात काम करतांना विविध पदं भुषवली. प्रथम २००५ साली प्रकल्प अधिकारी, २००६ साली तहसीलदार, २००७ साली सहाय्यक आयुक्त, विक्रीकर विभाग अशा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत सलग निवडी होत गेल्या. २००६ साली नायब तहसीलदार व प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग या दोन्ही वर्ग २ च्या पदांसाठी निवडी झाल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत असतांना २०१० साली थोडक्यात अपयश आले. पण अपयशामुळे खचून न जाता २०११ साली अधिक जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केला. अखेर अभ्यासूवृत्ती, परिश्रम, जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा फलद्रूप झाली.
प्रशासनात काम करतांना जे काही निर्णय मी घेतले ते लोकभावनेचा विचार आणि आदर करूनच. अनेकदा काही निर्णय घेण्याशिवाय पर्यायच नसतो.

शिर्डीतील कार्यकाळ हा माझा कायम स्मरणात राहील. शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा संस्थानचा पदभार घेतल्यानंतर जे काही निर्णय घेतले त्यामुळे काहीसा रोष ओढावला गेला. पण ते निर्णय सीईओला वाटते म्हणून घेतले नव्हते. सर्व बाबी तपासून, अभ्यासून लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी घेतलेले निर्णय होते. शिर्डी मंदिरात दर्शनव्यवस्थेत बराच गोंधळ होता. याकरीता मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावले. त्यामुळे दर्शन व्यवस्थेत सुसूत्रता आली व बाबांच्या दानपेटीत वाढ झाली. १५ ते १६ वर्षांपासून आयकर विभागाने संस्थानवर मोठा आयकर लादला होता पण माझ्या कारकिर्दीत पाठपुरावा करून १७५ कोटींच्या आयकरात संस्थानला सूट मिळाली. शिर्डीत सुमारे पाचशे कंत्राटी कर्मचार्‍यांच्या रजा व सुटयांबाबत निर्णय घेतले. अनेकदा प्रशासनात काम करतांना महिला अधिकार्‍यांना अडचणी येतात, आव्हाने स्विकारावी लागतात. पण मला तसे काहीच वाटले नाही कारण मी नेहमी लोकभावनेचा विचार करून निर्णय घेतले. आजच्या महिला दिनानिमित्त भावी पिढीला, युवती आणि महिलांना मी एवढचं सांगू इच्छिते…
दिवसभराच्या संघर्षाने मोकळे श्वास व्हावे
व्हावे माझे पंख इतके बुलंद की, आभाळानेही विश्रांतीला यावे.

हा ठरला आयुष्याचा टर्निंग पॉईंट

मी एकदा आमच्या घराच्या अंगणात उभी होते. १७ ते १८ वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. पोलिसांची एक गाडी घरासमोर उभी राहीली. एक अत्यंत रुबाबदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याच्या वर्दीत घरी आले. त्यांनी वडिलांची चौकशी केली. वडील बाहेर येताच कॅप काढत ते वडिलांच्या पाया पडले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. वडिलांनी आपल्या विद्यार्थ्याला ओळखलं. गावातील तो एक उनाड मुलगा होता. आयुष्यात तो काही होईल, अशी आशा त्याच्या वडिलांनी सोडून दिली होती. तसे त्यांनी वडिलांना बोलून दाखवले होते. माझ्या वडिलांनी त्या मुलाला असा धडा शिकवला की, परत त्याने कधी शाळा बुडवली नाही. पुढे तो पोलीस अधिकारी झाला. तो भेटायला आला तेव्हा सीआयडीत मोठ्या पदावर कार्यरत होता. त्याची जाण म्हणून तो आवर्जून वडिलांकडे भेटण्यासाठी आला होता.जर माझे वडील अशा एका विद्यार्थ्याला घडवू शकत असतील तर मग मी का नाही? हा प्रसंग आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

भूषवलेली पदे 

First Published on: March 8, 2023 12:52 PM
Exit mobile version