भाजपच्या हर सवाल का जबाब, एकही नवाब!, भास्कर जाधवांनी केलं मलिकांचं कौतुक

भाजपच्या हर सवाल का जबाब, एकही नवाब!, भास्कर जाधवांनी केलं मलिकांचं कौतुक

भास्कर जाधव (प्रातिनिधिक फोटो)

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचं कौतुक केलं आहे. भाजपच्या हर सवाल का जबाब, एकही नवाब, असं म्हणत भाजपचं गुंडाराज थांबवायचं असेल तर मलिक यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं.

भाजपच्या विरोधात कोणी काही बोलले की ईडीची चौकशी लावा, एनआयए, सीबीआयची चौकशी लावा, आयकर विभागाच्या धाडी टाकायला लावतात. अशा सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन आपल्याविरोधात सत्य जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याला नामोहरण केलं जातं. परंतु, नवाब मलिकांना धन्यवाद दिले पाहिजे. भाजपच्या हर एक सवाल का जबाब, एकही नवाब है! भाजपचं गुंडाराज थांबवायचं असेल तर मलिक यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं भास्कर जाधव म्हणाले.

नवाब मलिकांचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीच्या चुकीच्या कारवायांबद्दल गौप्यस्फोट करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक गेले काही दिवस पत्रकार परिषदा घेऊन बॉम्ब फोडत आहेत. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. नवाब मलिक करत असलेल्या स्फोटांची मंत्रिमंडळाने दखल घेत सर्वच मंत्र्यांनी कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत नवाब मलिक यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना व्हिडिओ क्लिप, कागदपत्रे सादर केली, त्याचा उल्लेख करीत मलिक यांचं कौतुक केलं. ‘नवाब मलिक…गुड गोईंग’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थित सर्वच मंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला. तसंच, ‘मलिक यांनी जी भूमिका घेतली आहे, ती अशीच पुढे सुरू ठेवावी,’ अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करताच सर्व मंत्र्यांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला.

होय मुख्यमंत्र्यांनी माझी प्रशंसा केली – नवाब मलिक

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

 

First Published on: November 11, 2021 1:43 PM
Exit mobile version