विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या यादीत भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या यादीत भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची लवकरच निवड होणार असून, शिवसेनेच्या यादीत नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी व जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळणार असल्याने सेनेच्या कोट्यातून कुणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रात प्राविण्य मिळवणार्‍या व्यक्तिंना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी दिली जाते. येत्या काही दिवसांत ही निवड प्रक्रिया होण्याची चिन्हे दिसत असून, त्यादृष्टीने महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. शिवसेनेला चार जागा मिळणार असल्याने त्यासाठी प्राथमिक यादीही तयार झाल्याचे समजते. यात माजी आमदार माजी आमदार सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, सचिव मिलिंद नार्वेकर, युवा नेते राहुल कनाल, नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते नितीन बानगुडे-पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील या दोघांपैकी एका नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, माजी आमदार बाळासाहेब सानप हेदेखील इच्छुकांच्या यादीत असल्याचे समजते.

एकनाथ खडसेंचे काय?

भाजपला सोडचिठ्ठी देवून नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांना विधान परिषदेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. खडसेंना विधान परिषदेत घेवून मंत्रिमंडळात कोणते स्थान दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधान परिषदेच्या जागांसाठी लवकरच निवड प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या यादीत नाशिकच्या माझ्यासह दोघांची नावे असल्याचे समजते. उद्धवसाहेब घेतील तो निर्णय मान्य राहील.
– भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख, नाशिक

First Published on: October 27, 2020 10:39 PM
Exit mobile version