भीमा कोरेगाव आयोगाचे शरद पवारांना समन्स; ४ एप्रिलला होणार चौकशी

भीमा कोरेगाव आयोगाचे शरद पवारांना समन्स; ४ एप्रिलला होणार चौकशी

भीमा कोरेगाव आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवले आहे. ४ एप्रिल रोजी त्यांना आयोगासमोर हजर राहावे लागणार आहे. २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये जी दंगल उसळली होती, त्यामागील कारणीमीमांसा शोधण्याचे काम हा आयोग करत आहे. शरद पवार यांनी नुकतेच एल्गार परिषदेचा तपास राज्य सरकारने एसआयटी नेमून करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर चार तासातच केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे दिला होता.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आयोगाने ३० मार्चची सुनावणी पुढे ढकलली आहे. कमिशनचे सरचिटणीस व्ही. पळनीटकर यांनी चौकशीसाठी आता ४ एप्रिल ही नवी तारीख दिली आहे. याआधी शरद पवार यांनी आयोगासमोर २०१८ साली आपले प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ज्यामध्ये त्यांनी १ जानेवारी रोजी झालेला भीमा कोरेगाव हिंसाचार रोखण्यात राज्य सरकार आणि सरकारी यंत्रणांना अपयश आल्याचा आरोप केला होता.

एल्गार परिषद प्रकरणी ज्या लोकांना अटक केली आहे ते ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथील एल्गार परिषदेला उपस्थित नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची स्थापना करावी, असे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

First Published on: March 18, 2020 12:02 PM
Exit mobile version