भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग 

भिवंडीत धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भीषण आग 
एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. सगळे व्यापार उद्योग बंद असतांनाही ज्वालामुखीचा तालुका म्हणून नवी ओळख निर्माण झालेल्या भिवंडीतील राहनाळ येथील बस स्थानकाजवळ असलेल्या दौलत कंपाउंड येथे धागा बनविण्यासाठी लागणाऱ्या कोमचा साठा केलेल्या गोदामाला सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही, मात्र गोदामाच्या बाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती आणि हि आग गोदामात पसरली असे स्थानिकांकडून बोलले जात आहे. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे धाग्याच्या कोमचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. मात्र आग लागल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचा शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत . महत्वाचे म्हणजे या गोदामाच्या बाजूलाच थोड्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान याच राहनाल गावातील कांचन कंपाऊंड येथे मागील आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धाग्यांचे कोम साठवलेल्या गोदामाला भिषण आग लागली होती. त्यामुळे या आगी आगीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमधून उलट सुलट चर्चा ऐकायला येत आहेत. दरम्यान देशभर संचारबंदी असूनही भिवंडीत आग लागण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. त्यामुळे या आगी नेमकी लागतात कि लावल्या जातात अशी शंका निर्माण होत आहे.
First Published on: April 7, 2020 12:25 PM
Exit mobile version