मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून भुजबळ वेटींगवर; भेटीसाठी वेळ मागूनही मिळत नसल्याची खंत

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून भुजबळ वेटींगवर; भेटीसाठी वेळ मागूनही मिळत नसल्याची खंत

नाशिक : माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आमदारांना भेटीसाठी वेळ देत नसल्याने अनेकजण त्यांना सोडून गेले. पण मी, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागत आहे मात्र मला वेळ दिली जात नाही. मेसेजला एखाद्यावेळी आला तर रिप्लाय येतो अशी खंत व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली.

नाशिक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून वेळ दिला जात नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. १९९८५ पासून मी आमदार आहे. १९९१ मध्ये मी मंत्री झालो सभागृहातील ज्येष्ठ लोकप्रतिनिधी असतांनाही अशा पध्दतीची वागूणक चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा दाखला देत सांगितले की, देशमुख मुख्यमंत्री असतांना मंत्री, आमदार आणि नागरिकांसाठी वेळ राखीव ठेवत असतं, निदान या सरकारने तरी याबाबत काही नियोजन करावे. माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांच्याच गटाच्या ४० आमदारांची गर्दी असते त्यामुळे त्यांनी आता ४० जणांपुरते मर्यादित न राहता राज्यांच्या आमदारांचीही कामे करावीत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महाराष्ट्राची ही परंपरा नाही

छगन भुजबळ म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच होय, मी बदला घेतलाय, असे वक्तव्य केले आहे. राजकारणात बदल्याच्या भावनेने कुणीच वागू नये. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. इतर राज्यात असे राजकारण होत असेल. मात्र, महाराष्ट्रात अशा राजकारणाला स्थान नाही. महाराष्ट्राची परंपरा सर्वांनीच जपली पाहीजे. सत्ताधार्‍यांनी चांगले काम केले तर आम्हीही सत्ताधार्‍यांसोबत आहोत असे त्यांनी सांगितले.

First Published on: November 16, 2022 3:22 PM
Exit mobile version