गेहलोत सरकार पाडण्यासाठी मुंबईतून ५०० कोटींची रसद; सचिन सावंत यांचा आरोप

गेहलोत सरकार पाडण्यासाठी मुंबईतून ५०० कोटींची रसद; सचिन सावंत यांचा आरोप

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट

राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केला. केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता आणि पैसा यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला.

कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलीस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भात बैठका होत होत्या. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत, असे सावंत म्हणाले.

आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. गृहमंत्र्यांना याबाबत त्यांच्या विभागाकडून माहिती मिळाली आहे. राजस्थान सरकारच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केलेली कारवाई आणि मिळालेल्या ऑडिओ टेप्समध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोडेबाजाराला दुजोरा मिळत असल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.

या गंभीर प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लक्ष घालावे अशी विनंती आपण त्यांना केली आहे व त्यांनी ती मान्य केली आहे, असे सांगून लोकशाहीत असे अघोरी प्रकार करणाऱ्यांचे महाराष्ट्र भाजपातील मास्टमाईंड शोधले पाहिजेत, अशी मागणी सावंत यांनी केली.

First Published on: July 17, 2020 7:37 PM
Exit mobile version