मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

मोठी बातमी! MPSC ची परीक्षा पुढे ढकलली

राज्यातील येत्या ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून MPSC परीक्षा पुढे ढकलली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनाही पुन्हा संधी मिळणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाने केली होती. याशिवाय, इतर समाजातील विद्यार्थ्यांनी देखील अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. कोरोनामुळे परीक्षेबाबत संभ्रमावस्था होती. त्यामुळे आता काही कालावधी घेऊन परीक्षेची तारीख ठरवली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परीक्षा होऊ देणार नाही या मराठा समाजाच्या भूमिकेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घेऊ, असं सांगितलं.

“११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीाजेंनीही केली होती. ज्यानंतर अखेर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्यानंतर ११ ऑक्टोबरला होणाऱ्या एमपीएससी परीक्षेविरोधात मराठा समाज आक्रमक झाला होता. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. मराठा आरक्षणाबाबत आक्रमक झालेले संभाजीराजे छत्रपती यांनीही परीक्षा रद्द न झाल्यास एमपीएससीच्या केंद्रे ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता.

First Published on: October 9, 2020 6:31 PM
Exit mobile version