संजय राऊतांना मोठा धक्का; विश्वासू समर्थक भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात सामील

संजय राऊतांना मोठा धक्का; विश्वासू समर्थक भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात सामील

नाशिक : मागच्याच आठवड्यात नाशिक मधील १२ नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले होते. त्यातच आता खासदार संजय राऊत यांचे खंदे समर्थक असलेले तसेच शिवसेना (ठाकरे गट) नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकच्या ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, चौधरी यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांची उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हकालपट्टी केल्याची घोषणा केली आहे.

खा. संजय राऊत यांच्याकडे अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यावर राऊत यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदी त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वासू, निकटवर्तीय डोंबिवलीचे माजी महानगरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे देण्यात आली होती. चौधरी यांच्या शिंदे गटात प्रवेश म्हणजे संजय राऊत यांना मोठा धक्का मानला जातोय.

मागील महिन्यातच नाशिक मधील काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या शक्यतेनंतर संजय राऊत यांनी १५ दिवसात दोनदा नाशिक दौरा करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक नगरसेवकाशी वन टू वन चर्चाही केली होती. परंतु त्यांची पाठ फिरताच १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्याकडे राऊत यांचे अपयश मानले गेले होते. त्यातच आता, आणखी काही नगरसेवक आणि मोठे पदाधिकारीही शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चां आहेत. त्यामुळे राज्यात सत्तांतर आणि शिवसेनेत ऐतिहासिक फुटीनंतरही नाशिकचा गड शाबूत राहिला होता. परंतु, आता नाशिकचा गड ढासळताना दिसत असल्याने ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे.

चौधरींचा नाशिक शिवसेनेत चांगला संवाद

२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर आ.अजय चौधरी यांच्या जागी भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या काळात त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले. या दरम्यान त्यांचे नाशिक मधील नगरसेवक तसेच मुख्य नेत्यांसह तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगला संवाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाने नाशिक शिवसेना ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, त्यांचा स्थानिक नेते, नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिकांशी असलेल्या संवादाचा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First Published on: December 21, 2022 8:26 PM
Exit mobile version