मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आवश्यक यंत्रणा तैनात ठेवून पूर्व तयारी करते. मात्र अतिवृष्टी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठ्या भरतीमुळे उंच लाटा उसळल्यास शहर व उपनगरातील सखल भागात पावसाचे पाणी हमखास साचून जलमय स्थिती निर्माण होते. यंदा १३ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात मोठी भरती असून किमान ४.५१ मिटर ते ४.८७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. नेमके त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने हे २२ दिवस मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतात.
त्यामुळे मुंबईकरांना या २२ दिवसात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः या कालावधीत काही कामासाठी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज व माहिती घेऊनच घराबाहेर पडावे लागेल. अन्यथा २६ जुलै २००५ ची पुनरावृत्ती होऊन त्यामुळे जीवित व वित्तीय हानी होऊ शकते.
दरम्यान, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, नुकताच नालेसफाई पाहणी दौरा केला होता. त्यावेळी मुंबईत समुद्रात मोठी भरती असताना ६५ मिमी पेक्षा जास्त म्हणजे ८० – ९० मिमी जरी पाऊस एका तासात पडल्यास पालिकेची भौगोलिक स्थिती, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता पाहता मुंबईत साहजीकच पावसाचे पाणी काही वेळ साचणारच, अशी कबुली प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यामुळे पालिका पावसाळ्यात मुंबईतील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेल मात्र जर समुद्राला मोठी भरती असेल व त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईचे जनजीवन हे ‘रामभरोसे’ असेल.
तारीख वेळ लाटांची उंची ( मिटर मध्ये)
जून महिना
१३ जून ११.०८ ४.५६ मी.
१४ जून ११.५६ ४.७७ मी.
१५ जून १२.४६ ४.८६ मी.
१६ जून १३.३५ ४.८७ मी.
१७ जून १४.२५ ४.८० मी.
१८जून १५.१६ ४.६६ मी.
जुलै महिना
१३ जुलै ११.४४ ४.६८ मी.
१४ जुलै १२.३३ ४.८२ मी.
१५ जुलै १३.२२ ४.८७ मी.
१६ जुलै १४.०८ ४.८५ मी.
१७ जुलै १४.५४ ४.७३ मी.
१८ जुलै १५.३८ ४.५१ मी.
ऑगस्ट महिना
११ ऑगस्ट ११.३३ ४.५९ मी.
१२ ऑगस्ट १२.१८ ४.७७ मी.
१३ ऑगस्ट १३.०० ४.८५ मी.
१४ ऑगस्ट १३.३९ ४.८१ मी.
१५ ऑगस्ट १४.१८ ४.६६ मी.
सप्टेंबर महिना
९ सप्टेंबर ११.१६ ४.५२ मी.
१० सप्टेंबर ११.५५ ४.६८ मी.
११ सप्टेंबर १२.३१ ४.७३ मी.
१२ सप्टेंबर १३.०५ ४.६५ मी.
१३ सप्टेंबर ०१.३४ ४.५६ मी.