बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची अतिवृष्टीवरही मात

बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची अतिवृष्टीवरही मात

अकोले : जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शेतीलाही बसला.मात्र, जिद्दी आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही अशीच काहीशी परिस्थिती होती. निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली.

चालू खरीप हंगामामध्ये सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका बसला आहे. बहुतेक शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यातून काही शेतकरी सावरले तर काही शेतकरी जमीनदोस्त झाले, अशीच काही परिस्थिती बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यावर ओढावली होती. अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागेल. घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतामध्ये पेरावे लागले. कारली, दोडका, घोसाळी, वाल, चंदन बटवा , मिरची, टोमॅटो, वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखवली. जिद्द आणि पूर्णपणे झोकून देत केलेल्या कामामुळे त्यांची बियाणे शेती पुन्हा एकदा बहरली. राज्यासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर गावरान बियांची मागणी त्यांच्याकडे होत असते. चालू हंगामात अतिवृष्टीमुळे बियाणे निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातून सावरत त्यांनी शेतकरी राजासाठी दर्जेदार व अस्सल गावठी बियाणे निर्माण केले आहे. आपल्या घरी येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याला बियाणे देता यावे, यासाठी त्यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था स्थापन केली आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने ही संस्था आदिवासी भागातील सुमारे 50 गावांमध्ये कार्य करत आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी देशी बियाण्याकडे वळून शेती समृद्ध करावी असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले आहे.

First Published on: November 17, 2022 1:02 PM
Exit mobile version