परभणीत ‘बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्याचा मृत्यू; बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत

परभणीत ‘बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्याचा मृत्यू; बीड, लातूरचे अहवाल प्रतिक्षेत

प्रातिनिधीक फोटो

देशभरासह राज्यात कोरोना व्हायरनने थैमान घातल्यानंतर राज्यापुढे नवं सकंट उभं ठाकलं आहे. देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे दिसून आले. गेल्या तीन दिवसांपूर्वी परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील ८०० कोंबड्याचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. मात्र मुरुंबा येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत. तसचे ग्रामपंचायत, वन विभाग, पाटबंधारे विभाग पातळींवर निगराणीचे आदेशही दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ठाणे, लातूर, परभणीसाऱख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. राज्यात अद्याप बर्ड फ्लूचा प्रदुर्भाव झाला नसल्याचे राज्य सरकारने सांगितलं होते. मात्र मुरुंबा येथे ८०० कोंबड्या मृत्यू पावल्या. दरम्यान या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने मध्ये प्रदेशमधील भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

या घटनेनंतर परभणी जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावलं उचलायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुरुंबा गाव परिसरातील १ किलोमीटर मधील पाळीव पक्षी नष्ट केले जाणार आहेत. याशिवाय १० किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण, खरेदी-विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

First Published on: January 11, 2021 9:08 AM
Exit mobile version