बिनकामाची पन्नाशी, भाजपची महाविकासआघाडीवर खोचक टीका!

बिनकामाची पन्नाशी, भाजपची महाविकासआघाडीवर खोचक टीका!

राज्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसायला लागलेला भाजप या ना त्या कारणावरून महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता तर महाविकास आघाडीला स्थापन होऊन पन्नास दिवस झाले, यावरून भाजपने सोशल मीडियावर बिनकामाची पन्नाशी’ म्हणत ठाकरे सरकारला डिवचले आहे. नुसते डिवचले नाही तर एक बॅनर बनवून तो भाजप महाराष्ट्र कडून ट्विट देखील करण्यात आला आहे. भाजपशी काडीमोड घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या साथीने राज्यात नवीन समीकरण जुळवून आणत महाविकास आघाडीचं सरकार बसवलं. पर्यायाने भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं. त्यामुळे चिडलेल्या भाजपाकडून वारंवार सरकारवर टीका होत आहे.

विशेष म्हणजे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारच्या कामाची तुलना करत महाविकास आघाडी कशी बिनकामाचे सरकार आहे हे बॅनरमध्ये दाखवण्यात येत आहे. यामध्ये सुप्रशासन कायदा-सुवस्थेसाठी तेव्हा शिवशाहीची किनार होती, तर आता सामान्य जनतेलाही मार पडतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

महा’भकास’ आघाडी!

याशिवाय कर्जमाफी, जलयुक्त शिवार, शेतकरी धोरण, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाला मंजुरी, नवी मुंबईतील विमानतळ आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न, यासह अनेक निर्णयांची भाजपने यादी जाहीर केली आहे.

तर दुसर्‍या बाजूला ‘महा’भकास’ आघाडी सरकार’ असे म्हणत ‘बिनकामाची पन्नाशी’ असे हेडिंग देत उद्धव ठाकरे यांच्या गेल्या ५० दिवसांतील कारभारावर टीका करण्यात आली आहे. यामध्ये फसवी कर्जमाफी, सातबारा कोरा झालाच नाही, मंत्र्यांची दालने, खाते यावरच केवळ बैठका, प्रशासनात सुस्ती, मलाईदार खात्यांसाठी चढाओढ, भाजपला दूर ठेवण्यासाठी गतिमान विकास थांबून स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी महाभकास आघाडी सरकारचे आता स्वार्थाचे तोरण, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

First Published on: January 19, 2020 5:46 PM
Exit mobile version