उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? पुण्याच्या कथित घोषणाबाजीवरून भाजपाचे शिवसेनेवर शरसंधान

उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? पुण्याच्या कथित घोषणाबाजीवरून भाजपाचे शिवसेनेवर शरसंधान

मुंबई : पीएफआयवरील कारवाईच्या विरोधातील निदर्शने करणाऱ्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या कथित घोषणा दिल्यावरून राज्यात आता वेगळेच राजकारण रंगले आहे. भाजपावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल करत भाजपाने शिवसेनेवर शरसंधान केले आहे.

एनआयए आणि ईडीने अलीकडेच देशभरात छापेमारीकरत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) राज्यस्तरीय नेत्यांना अटक केली. याचे पडसाद केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात उमटले. पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. पुणे पोलिसांनी 60 ते 70 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या दिल्याचे सांगण्यात येते. तथापि, पोलिसांनी याचा इन्कार केला आहे.

मात्र या कथित घोषणाबाजीवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, यातच हिंदुस्थानाचे हित आहे, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

या कथित घोषणाबाजीवरून आता भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. पीएफआयचा देशविरोधी कट उघड झाला आहे. पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या, हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या, तसेच सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणारे उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत? असा सवाल भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी’ लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले, संकटे टळून गेल्यावर ‘करून दाखवले’चे होर्डिंग लावणारे आता पीएफआयविरोधातील कारवाईचे समर्थनही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत. आता कुठल्या बिळात बसला आहात? असा सवालही आशिष शेलरा यांनी केला आहे.

First Published on: September 25, 2022 1:02 PM
Exit mobile version