महादेव जानकरांचा पत्ता कट; भाजपने केली ‘कुल’ खेळी

महादेव जानकरांचा पत्ता कट; भाजपने केली ‘कुल’ खेळी

कॅबिनेटमंत्री महादेव जानकर

बारामती लोकसभा मतदार संघातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपने उमेदवार घोषीत केला आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपने काल रात्री उशीरा ३६ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये राज्यातील भाजपचे सहा उमेदवार आहेत.

महादेव जानकर नाराज

बारामती लोकसभा मतदार संघात भाजपकडून कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन भाजपमध्ये खल सुरु होते. रासपचे नेते महादेव जानकर यांना या मतदार संघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल असे वाटत होते तसा दावा देखील त्यांनी अनेकदा केला. मात्र त्यांच पक्षातील आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देत भाजपकडून जानकरांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे महादेव जानकर यांच्याकडून नाराजी वर्तवली जाते.

रासपाच्याच कांचन कुल यांना उमेदवारी

बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन भाजपमध्ये खूप चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर काल निर्णय होऊन कांचन कुल यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे केले. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रासपचे महादेव जानकर उभे होते. मात्र महादेव जानकर यांचा ६९ हजार मतांनी पराभव झाला. यावेळी देखील महादेव जानकर यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचसोबत त्यांनी भाजपकडे याबाबत मागणी केली. मात्र जानकरांचा पत्ता कट करत कुल यांना उमेदवारी देण्यात आली.

First Published on: March 23, 2019 11:30 AM
Exit mobile version