sachin vaze प्रकरणी फडणवीसांची दिल्लीवारी, शिवसेनेचे दोन नेते टार्गेटवर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. यामुळे भाजपला अधिकच बळ मिळाले असून याचसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांचाही या प्रकरणाशी कसा संबंध आहे यावर शहा यांच्याबरोबर चर्चा केली.

यावेळी फडणवीस यांनी शहा यांना सचिन वाझे प्रकरणाची संपूर्ण अपडेट दिली. तसेच याप्रकरणात सचिन वाझे हे प्यादे असून मुख्य सूत्रधार वेगळेच आहेत. तसेच या नाट्यमय घटनेत शिवसेनेचे दोन नेतेही कसे सहभागी आहेत याबद्दलही या उभयंतांमध्ये चर्चा झाल्याचे कळते. त्याचबरोबर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशीही एनआयकडेच द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

बुधवारी पत्रकार परिषदेतही फडणवीस यांनी वाझे यांचे नाव वसुली रॅकेटमध्ये आल्याचे सांगितले होते. तसेच २०१८ साली युतीचे सरकार असताना वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला फोन केल्याचेही फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगून गौप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर वाझे हे काम एकटा करू शकत नाही. यामुळे याप्रकरणाच्या मूळाशी जाणे गरजेचे असल्याचेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले होते. यामुळे फडणवीस यांची शहा भेट ही वाझे प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठीच होती यावर आता राजकीय वर्तृळात चर्चा सुरू आहे.

 

First Published on: March 18, 2021 2:22 PM
Exit mobile version