जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

राज्यातील सहा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे २२ जागा जिंकल्या आहेत. या पोटनिवडणुकीत काँग्रेस दुसर्‍या तर राष्ट्रवादी तिसर्‍या स्थानी असून शिवसेना चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे.

पालघरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या सहा जिल्हा परिषदांतील ८५ तर त्याअंतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी काल, मंगळवारी मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीची मतमोजणी बुधवारी होऊन निकाल जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसला १९, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ तर शिवसेनेला १२ जागा मिळाल्या आहेत. १२ ठिकाणी नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.

दरम्यान, भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीने जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आपलाच पक्ष अव्वल ठरल्याचा दावा केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सहा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून विजयी झाल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

या निकालाच्या तपशिलात गेले तर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून २५ टक्के जागा भाजपाला तर २५ टक्के जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळाल्या आहेत. उरलेल्या ५० टक्क्यात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सामावले आहेत. शिवसेनेच्या बळावर कोण मोठे होते आहे आणि शिवसेना कशी अधिकाधिक रसातळाला जात आहे, हेच या निवडणुकीतून दिसून येते आहे. भाजपचा जनाधार सातत्याने वाढतो आहे आणि इतरांचा जनाधार कमी होतो आहे. शिवसेना तर आणखी खाली जाते आहे. कोण रसातळाला जात आहे, हे या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

First Published on: October 7, 2021 6:40 AM
Exit mobile version