‘भाजप हे देशावर आलेलं संकट, ते दूर करायचंय’; शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमधून दंड थोपटले

‘भाजप हे देशावर आलेलं संकट, ते दूर करायचंय’; शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमधून दंड थोपटले

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडसत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप हे देशावर आलेल संकट आहे आणि ते दूर करायचं आहे, असं म्हणत शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधून दंड थोपटले आहेत. तसंच, ‘तुम्ही कितीही ईडी लावा, सीबीआय लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल’ असंही पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

केंद्र सरकार महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. केंद्राच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत असून राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला गेला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही, असा विश्वास पुन्हा एकदा शरद पवार यांनी बोलून दाखवला. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलं आहे ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.

सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये महाराष्ट्राची सुत्र

सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये महाराष्ट्राची सुत्र आहेत, असं शरद पवार म्हणाले. तीन पक्षाचं सरकार आहे. या सरकारमध्ये औद्योगिक सुधारणा करण्याची जी काय गरज आहे, ती निश्चित करणार आहोत. तसंच जास्तीत जास्त कामगारांना काम कसं मिळेल, याची काळजी आम्ही घेणार आहोत, असं प्रतिपादन पवार यांनी केलं.

ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे. त्या भाजपाच्या नेतृत्वाची भूमिका काय आहे? केंद्र सरकारचं काम राज्याला मदत कारायचं असतं. मात्र जीएसटीचे ३० हजार कोटी केंद्राकडे पडून आहेत. ते राज्याला देण्याचं काम आज केंद्र सरकार करत नाही. राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणण्याचा आणि सरकार पाडण्यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे, असं पवार म्हणाले.

 

First Published on: October 17, 2021 8:16 PM
Exit mobile version