‘धूर जेव्हा दिसतो तेव्हा खाली काहीतरी जळत असते’

‘धूर जेव्हा दिसतो तेव्हा खाली काहीतरी जळत असते’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

‘जेव्हा धूर दिसतो तेव्हा काहीतरी खाली जळत असते’, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शरद पवार यांना लगावला आहे. सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या लोगोचे सोमवारी त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला असून त्यामुळेच अन्य पक्षांतील अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र ३४ लाख हेक्टरवरून वाढून ४० लाख हेक्टर झाले. अशा प्रकारे विविध क्षेत्रात विकास झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. परिणामी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना भाजपामध्ये प्रवेश करावा असे वाटते. आगामी पंधरा वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपासोबत यावेसे वाटते.’ भाजपामध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षातील नेत्यांना जाणीव झाल्याचे देखील ते यावेळी म्हणालेत.

३१ जुलैला जोरदार इनकमिंग

सगळ्यात महत्वाचे म्हणजे ३१ जुलै रोजी भाजपामध्ये अनेक जण प्रवेश करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. ‘३१ तारखेला सकाळी १० वाजता गरवारे पवेलीयन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच मंगळवारी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ मुंबईतून अमरावती जिल्ह्याकडे रवाना होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – मोदींनी सांगितले, मॅन वर्सेस वाईल्डमध्ये सहभागी होण्याचे कारण

First Published on: July 29, 2019 8:57 PM
Exit mobile version