सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले – देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्ष नेत्यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनावर व्यक्त केला शोक

सांगोल्याचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते गणपतराव देशमुख यांनी आज सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. सांगोला येथून तब्बल ११ वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. वयाच्या ९४ व्या वर्षातही ते समाजकार्यात सक्रिय होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालावली. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनीही शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले – देवेंद फडणवीस 

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

५० वर्षातील महाराष्ट्राच्या जडणघडणीत  अनन्यसाधारण योगदान – चंद्रकांत पाटील 

शेतकरी व कामगारांसाठी वारंवार आवाज उठवणारे शेकापचे ज्येष्ठ नेते मा. श्री. गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याचे कळले. गेल्या ५० वर्षातील महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. तब्बल ११ वेळा सांगोला या एकाच मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. 
First Published on: July 30, 2021 11:53 PM
Exit mobile version