महाराष्ट्रात काय दिवे लावलेत ते बोला; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात काय दिवे लावलेत ते बोला; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

कोकणातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपकडून 'फिफ्थ पिल्लर' उपक्रमाचा प्रारंभ

विधीमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशन सुरु व्हायच्या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारचा समाचार घेतला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय झाले ते बोलतात. महाराष्ट्रात काय दिवे लावलात ते बोला, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, आज पूर आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कोरोना काळात सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, “बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरु असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना सुद्धा मदत करा. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही?” असा सवाल फडणवीस यांनी विचारला. काही बंगल्यांची पाणीपट्टी थकलीय, त्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, तो पीडब्ल्यूडीच्या अख्त्यारीतील विषय आहे. PWD ने योग्य ती माहिती घेऊन, योग्य ती कारवाई करावी.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. “इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झाले ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात,” असा घणाघात फडणवीसांनी केला. “तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण वास्तवात एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.


हेही वाचा – हिवाळी अधिवेशन: मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन


 

First Published on: December 14, 2020 12:36 PM
Exit mobile version