नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशावर विरोधी पक्षनेते आणि प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडणारे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील. भाजप दिलेला शब्द पाळतो असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. यावेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले.

“मला बिहारच्या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी मिळाली होती. अगदी सुरुवातीपासून ते तिकीट वाटपापर्यंत, प्रचारापर्यंत मी सहभागी होतो. शेवटच्या टप्प्यात आजारी असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. पण मोदींच्या सभांपर्यंत संपूर्ण व्यवस्थेत होतो. हा एक वेगळा अनुभव आहे. प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये काही असले तरी राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरुक आहे. एक वेगळ्या प्रकारचे राजकारण पहायला मिळाले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार असे सांगितले. “मुख्यमंत्री जेडीयूचा होईल आणि ते नितीश कुमार असतील हे आधीच ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तशी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात बदल नाही. भाजप शब्दाचे पक्के आहे. महाराष्ट्रात मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर त्यांच्या संमतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली होती. आम्ही त्यावर अडून राहीलो. इथे मोदींनी जेडीयूचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करु,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – विकास हवाय हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं; फडणवीसांनी मानले मतदारांचे आभार


 

First Published on: November 11, 2020 1:33 PM
Exit mobile version