‘मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे’

‘मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे’

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत. साडे चार वर्षांपूर्वी त्यांच्यावर राज्य सरकारकडून गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु, जमीन भूखंड घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून गृहमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळीत आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाख खडसे यांना पुण्याच्या जमीन भूखंडाप्रकरणी कोर्टाने क्लीन चीट दिली होती. तरीदेखील त्यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. यामुळे ते मनातल्या मनात नाराज होते. त्यांनी ही नाराजी आतापर्यंत लपवली होती. परंतु, ही नाराजी त्यांनी आता व्यक्त केली आहे. शनिवारी पुण्यात डॉ. सुधाकरराव जाधवर संस्थेतर्फे आयोजित युवा संसदेमध्ये ते व्यक्त झाले आहेत. ‘मी काय गुन्हा केला? ते पक्षाने आणि सरकारने सांगावे’, असे खडसे म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?

एकनाथ खडसे म्हणाले की, ‘गेल्या ४० वर्षांपासून मी निवडणूक हरलो नाही. या काळात मी फार संघर्ष केला आणि पारदर्शी कारभार केला. परंतु, तरीही मला भ्रष्टाचारी ठरवले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे कोणी पाहत नाही. पक्ष आणि सरकारला माझा एकच प्रश्न आहे की, मी गुन्हा काय केला ते मला सांगा’. यापुढे ते म्हणाले की, ‘गुन्हेगारी विरोधात लढा देऊनही माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे संबंध जोडले गेले. ते खरे की खोटे कोणी पाहत नाही’. त्यामुळे ही खंत मी वारंवार बोलून दाखविणार आहे. त्याचबरोबर आता कोणाकडे बघून राजकारणात येण्याची आता हमी देता येत नाही, असेही खडसे म्हणाले.

First Published on: February 3, 2019 8:30 PM
Exit mobile version