किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन

किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. सोबतच किरीट सोमय्या यांना अटक झाल्यास 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्याचेही आदेश दिले आहेत. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने किरीट सोमय्या यांच्या विरोधातील तक्रार अस्पष्ट आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर आधारलेली असल्याचे निरीक्षण नोंदवले. सोबतच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेल्या समन्सनुसार १८ एप्रिलपासून पुढील 4 दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी हायकोर्टाने दिले. तसेच याप्रकरणी अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५8 कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

ठाकरे कुटुंबाचे घोटाळे बाहेर काढणार
कोर्टाकडून दिलासा मिळताच काही दिवसांपासून बेपत्ता झालेले किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले व त्यांनी ‘विक्रांत’मध्ये एक दमडीचाही घोटाळा आम्ही केलेला नाही, असे सांगितले. संजय राऊत हे तर फक्त प्रवक्ते आहेत. खरे सूत्रधार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत. उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने कशा पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार केले ते आपण बाहेर काढणार आहोत. मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ आणि यशवंत जाधव यांच्या विरोधातील प्रकरणांनादेखील येत्या दोन ते चार दिवसांत गती मिळणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

First Published on: April 14, 2022 6:30 AM
Exit mobile version