अनिल परब यांच्या अडचणीत भर, किरीट सोमैय्या रिसॉर्टविरोधात दाखल करणार तक्रार

अनिल परब यांच्या अडचणीत भर, किरीट सोमैय्या रिसॉर्टविरोधात दाखल करणार तक्रार

अनिल परब यांच्या अडचणीत भर, किरीट सोमैय्या रिसॉर्टविरोधात दाखल करणार तक्रार

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वीच परब यांच्याविरोधात आरटीओत बदलीमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला असून यावर नाशिक पोलीस चौकशी करत आहेत. तर आता दापोली येथे बांधलेल्या साई रिसॉर्टविरुद्ध भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या महाराष्ट्र जमीन महसून अधिनियम कलम ४५ अंतर्गत तक्रार करणार आहेत. अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या यांनी यापुर्वीच अनेक आरोप पुराव्यानिशी केले आहेत. यातील ६ आरोपांवर विविध यंत्रणांची चौकशी देखील सुरु आहे यामुळे अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे असल्याचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी म्हटले होते.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी १ महिन्यापुर्वीच अनिल परब यांच्यावर अवैध रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी दापोलीत जाऊन पुरावे गोळा केले होते. आरोपात सोमैय्या यांनी म्हटले आहे की, दापोली जवळील मुरुड समुद्र किनाऱ्यावर लॉकडाऊनच्या काळात २०२० मध्ये अनिल परब यांनी अलिशान साई रिसॉर्ट उभारले. जून २०१९मध्ये अनिल परब यांनी जमीन खरेदी केली परंतु सात बारा नावावर केलेला नाही. परबांनी ठाकरे सरकारच्या अधिकारांचा दुरुपयोग करुन सगळे नियम धाब्यावर बसवून समुद्र किनारी सीआरझेडमध्ये रिसॉर्ट बांधला आहे. तसेच हा रिसॉर्ट त्यांनी २९ फेब्रुवारी २०२१ मध्ये भागीदार शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केला असल्याचा आरोप किरिट सोमैय्या यांनी केला आहे.

किरीट सोमैय्या तक्रार दाखल करणार

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. “मी आज दुपारी १२.३० वाजता दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब साई रिसॉर्ट विरूध्द भारतीय दंड संहिता कलम ४२०…पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम १५ महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५६ (अ), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४५ अंतर्गत तक्रार करणार” अशा आशयाचे ट्विट किरीट सोमैय्या यांनी केले आहे.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पोलखोल करण्याच्या विडाच उचललेला आहे. महाविकास आघाडीतील भ्रष्ट नेत्यांवर पुराव्यानिशी आरोप करुन या नेत्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न किरीट सोमैय्या यांनी केला आहे. राज्यपाल, लोकायुक्त,ईडी,सीबीआय अशा यंत्रणांकडे अनिल परब यांच्याविरोधात तक्रारी करुन चौकशीही सुरु झाल्या आहेत.

First Published on: June 2, 2021 11:35 AM
Exit mobile version