शरद पवारांचं जातीयवादी कव्हर हे जितेंद्र आव्हाड – प्रवीण दरेकर

शरद पवारांचं जातीयवादी कव्हर हे जितेंद्र आव्हाड – प्रवीण दरेकर

राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय, अशी खोचक टीका गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. याच पार्श्वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी शरद पवारांचे जातीयवादी कव्हर हे जितेंद्र आव्हाड असल्याची गंभीर टीका केली आहे. तसेच ते म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड मतांच्या लाचारीसाठी कसे लांगुलचालन करतायत त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले.’

आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे अशी राऊतांची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकारणात सध्या एकच खळबळ माजली आहे. आरोप-प्रत्यारोपचे सध्या सत्र सुरू आहे. यादरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातील दरेकर म्हणाले की, ‘ज्यावेळी राज ठाकरे मोदी आणि भाजपवर बोलत होते, त्यावेळी या मंडळींना गुदगुदल्या होत होत्या. त्यामुळे आता जरा टीका सहन करण्याची तयारी ठेवा ना. पण आता त्यांना टीका बोचायला, टोचायला लागल्या आहेत. मग संजय राऊतांनी सांगावं त्यावेळेला ते कोणाची भाषा बोलते होते? पवारांची बोलत होते की आणखीन कोणाची? म्हणजे आपल्या मनासारखे झाले तर चांगले आणि आपल्या भूमिकेविरोधात झाले तर वाईट. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे अशी भूमिका संजय राऊत सातत्याने घेताना दिसत आहेत. आपण सांगा, हिंदुत्वाच्या बाबतीत टीका केल्यावर आपल्याला बोचते ना? महाविकास आघाडी सरकार बनवल्यानंतर आपण हिंदुत्वादी भूमिकेला ताकद देणारे, पाठबळ देणारे एक कृत्य त्या ठिकाणी सांगा. उलट पक्ष आपल्या अनेक गोष्टी हिंदुत्वाच्या विरोधात सत्तेच्या लाचारीसाठी झालेले सांगता येईल. जे पाघलरला साधू हत्याकांड झाले त्यावर कुठेही भूमिका आलेली नाही. आपण सत्तेबरोबर फरपटत गेला. आपली जनाब बाळासाहेब आणि अजानसंदर्भात भूमिका आली नाही. राम मंदिराचे जेव्हा उद्घाटन होते त्यावेळेस डिजिटलमाध्यातून तुम्ही उपरोधिक टीका केली. म्हणून मला वाटते सत्ता महत्त्वाची ठरली आहे. अगदी काल परवा कोल्हापूरला निवडणूकीला सुद्धा बाळासाहेबांच्या समोर सोनिया गांधी, शरद पवारांचा एकत्रित फोटो आणि हाताचे चिन्ह होते. आयुष्यभर बाळासाहेबांनी शरद पवार असतील, सोनिया असतील या पक्षावर टोकाच्या टीका केल्या आणि भूमिका घेतल्या. मग हे केवळ सत्तेसाठी आपले एकत्रिकरण चालले आहे. याचे उत्तर आणि भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडवी.’

‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करावे’

पुढे दरेकरण म्हणाले की, ‘आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा थयथयाट सुरू आहे. आणि त्यांची इकोसिस्टिम राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर निफळ ठरल्याचे दिसतेय. राज ठाकरेंनी जे विचारले त्याचे उत्तर दिले नाही. वर्माला हात घातल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थयथयाट सुरू असून सोयीने या भूमिकेपासून पळ काढण्याचा काम करत आहे. जितेंद्र आव्हाड मतांच्या लाचारीसाठी कसे लांगुलचालन करतायत हे त्यांच्या पत्रकार परिषदेतून दिसून आले. मुंब्र्यात बदल होतोय हे मानायचे असेल, तर त्यांनी एकदा मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करावे आणि त्यानंतर मुंब्र्यात बदल झालाय हे महाराष्ट्राची जनता मान्य करेल. दरम्यान मुंब्र्यातील हिंदू जनता एकमताने आव्हाडांना पाडू शकता हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे. तेव्हा अशाप्रकारच्या बडबड निश्चितपणे थांबतील.’

‘आव्हाड जय भीम का बोलले नाहीत?’

‘राज ठाकरे बोलताना व्यासपिठावरचा जॉनी लिव्हर असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. शरद पवारांचे जातीयवादी कव्हर हे जितेंद्र आव्हाड आहे. त्यामुळे अशाप्रकारचे महाराष्ट्रात जातीयवादी विष पेरण्याचे काम महाराष्ट्रात काही प्रमुख नेते करत असतात. त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचा प्रथम क्रमांक आहे. आताही बोलताना ते जय भीम का बोलले नाहीत? शाहू, फुले, आंबेडकर यांचे अभिवादन छत्रपतींना आहे. त्याच्यामुळे मला असे वाटते, जातीयवादाला खतं, पाणी घालण्याचे काम या ठिकाणी जर कोण करत असेल तर ते राष्ट्रवादीचे नेते करतात. हे अनेक उदाहरणातून दाखवून देता येईल. आनंद करमुसेंना खुलेआम गुंड पाठवून मारहाण करणाऱ्यांनी सादन सुचिता दाखवण्याचे काही कारण नाही,’ अशा प्रकारे दरेकरांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला.


हेही वाचा – राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका


First Published on: April 13, 2022 1:43 PM
Exit mobile version