करोना निधी : भाजप लोकप्रतिनिधींनी दिले वेतन, युवक कॉंग्रेसचे रक्तदान

करोना निधी : भाजप लोकप्रतिनिधींनी दिले वेतन, युवक कॉंग्रेसचे रक्तदान

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात निर्माण झालेल्या करोना संकटावर मात करण्यासाठी भाजपचे मुंबईतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या एक महिनचे वेतन राज्याच्या आपत्कालीन निधीत जमा करतील, लोकप्रतिनिधींच्या या निधीत पक्षाचे पदाधिकारीही आपला वाटा देतील, अशी माहिती भाजपचे मुंबई विभागीय अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

करोना संसर्गाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी भाजपने आपले योगदान पुढे केले असून, याची सुरुवात याआधीच गरजूंना मदतीपासून केली जात असल्याचे पक्षाच्या मुंबई अध्यक्षांनी म्हटले आहे. या संकटाला राज्याला सामोरे जाण्यासाठी पक्षाचे सगळे नगरसेवक आणि आमदार आपल्या एक महिन्याचे वेतन राज्य आपत्कालीन कोषात जमा करतील. याशिवाय सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आपला वाटा त्यात जमा करतील, असे लोढा म्हणाले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या आवाहनानंतर पक्षाने लॉकडाऊन’ध्ये ’मुंबईत जेवणाची अडचण असलेल्या गरजू लोकांना कार्यकर्त्यांकडून  भोजन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

युवक काँगेसच्या वतीने टोकन पध्दतीने रक्तदान

कोरोनाच्या भितीमुळे नागरिकांनी रक्तदान शिबिरांकडे पाठ फिरवल्याच्या पार्श्‍वभूमीवर रक्त गोळा करण्याची मोहीम युवक काँग्रेसने हाती घेतली आहे. राज्यातील या संकटात रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी पुढाकार घेऊन युवक काँग्रेसने टोकन पध्दतीने रक्तदान करण्याचे जाहीर केले असून, त्याला सर्व स्तरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या सूचनांचे पालन करत युवक कॉंग्रेसने टोकन पध्दतीने  नागरिकांना स्वतंत्र वेळ देण्यात आली होती. या आवाहनास तात्काळ प्रतिसाद देत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे तांबे म्हणाले. आमदार कुणाल पाटील यांनी धुळ्यात आयोजित  केलेल्या रक्तदान शिबिरालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

First Published on: March 27, 2020 9:48 PM
Exit mobile version