भाजपचे आशिष देशमुख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

भाजपचे आशिष देशमुख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

भाजपचे आशिष देशमुख यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

भाजपचे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा ई-मेल मार्फत विधानसभेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या ते अधिकृतरित्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपविणार आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपवर नाराज

गेल्या कित्येक दिवसांपासून आशिष देशमुख भाजपवर नाराज आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टिका करण्यास सुरुवात केली होती. वेगळ्या विदर्भासाठी ते आग्रही होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही तसे पत्र लिहिले होते. परंतू, मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते अधिक संतप्त झाले होते. त्याचबरोबर योग्य वेळ येताच राजीनामा देईन, असे आशिष देशमुख यांनी म्हटले होते.

कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता

भाजपवर नाराज असलेले आशिष देशमुख यांनी योग्य वेळ येताच राजीनामा देईन, असा पवित्राही घेतला होता. आज गांधी जयंतीच्या निमित्ताने वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमावर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी येणार होते. देशमुख देखील या आश्रमाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शिवाय, देशमुख यांचे वडिल मंत्री रणजीत देशमुख हे कॉंग्रेसमध्ये होते. त्यामुळे आशिष देशमुख कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचबरोबर आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी राहुल गांधी यांची आज भेट घेतल्याच सांगितले जात आहे त्यामुळे त्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.

First Published on: October 2, 2018 4:23 PM
Exit mobile version