शिवेंद्रराजे भोसले यांची लवकरच घरवापसी?

शिवेंद्रराजे भोसले यांची लवकरच घरवापसी?

राज्यात भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचे नवनवे मुहूर्त आणि दावे केले जात असताना भाजपला आता मोठा धक्का बसणार आहे. सातार्‍याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकदा घरवापसी होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत इतरही आमदार आहेत जे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

यामुळे रंगली चर्चा

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकाच महिन्यात तीन वेळा भेट घेतली. त्यानंतर अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची पुन्हा एकदा भेट घेतली. मात्र, ही भेट बंद दाराआड झाली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चांगलीच चर्चा रंगली.

चर्चेला राष्ट्रवादीकडून दुजोरा

राजकीय पक्षात रंगलेल्या चर्चेला राष्ट्रवादीकडून दुजोरा देण्यात आला आहे. “शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या अनेक विद्यमान आणि माजी आमदारांचा लवकरच राष्ट्रावादीत प्रवेश होणार आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा काही दिवसातच आयोजित केला जाणार” असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणीत आलेल्या पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत म्हणाले की, “भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यानुसार शिवेंद्रराजेंसह अनेक माजी आणि विद्यमान आमदारांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेले १०० टक्के लोक पुन्हा एकदा वापस येण्यास इच्छुक आहेत. मात्र, त्या सर्वांचाच प्रवेश करुन घेण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तयार नाहीत. मात्र, शिवेंद्रराजेसह काही निवडक लोकांचा प्रवेश सोहळा लवकरच होणार आहे”.


हेही वाचा – भाजपचे निर्णायक नारायणास्त्र


 

First Published on: January 26, 2021 8:50 AM
Exit mobile version