केंद्राच्या मदतीने महाराष्ट्र कोरोनातून सावरला, हीना गावित यांची टीका

केंद्राच्या मदतीने महाराष्ट्र कोरोनातून सावरला, हीना गावित यांची टीका

“जनादेश धुडकावून फसवणुकीने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटल्याने कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली आहे,” अशी घणाघाती टीका भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांनी गुरुवारी येथे केली.

“केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या मदतीमुळेच महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यातून सावरू शकला.अन्यथा ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन कोरोनाविरोधातील केविलवाणी झुंज सुरूच राहिली असती,” अशी कोपरखळीही डॉ. गावित यांनी लगावली.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला येत्या २८ नोव्हेंबरला दोन वर्षं पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आजपत्रकार परिषदेत आघाडी सरकारवर टीका केली. कोरोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीची प्रशंसा करताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “महाराष्ट्रात कोरोनाकाळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची जोरदार स्पर्धाच सुरू होती. भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात सर्वाधिक कोरोना मृत्यू, सर्वाधिक रुग्णसंख्या, सर्वाधिक संसर्गदर आणि सर्वाधिक लुबाडणूक झाली. हजारो लोकांना नाहक प्राण गमवावे लागले. केंद्र सरकारकडून वेळोवेळी कानपिचक्या मिळूनही भ्रष्टाचार सुरूच राहिल्याने महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावली आणि सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्याने मात्र संधीची चांदी करून घेतली, ” असा आरोप डॉ. गावित यांनी केला.

“प्रत्येक अपयशावर पांघरुण घालत केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारला या काळात गरीबांसाठी मिळालेली मदतही लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात अपयश आल्यामुळे असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. कोविडकाळात मंत्रालयातून पळ काढून घरात कोंडून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रास वाऱ्यावर सोडून संकटाशी सामना करण्याची जबाबदारीही नागरिकांवरच ढकलली. या अपयशास ‘मी जबाबदार’ असे नागरिकांकडून वदवून घेताना, स्वतःच्या कुटुंबाची सुरक्षितता सांभाळत ‘माझे कुटुंब एवढीच माझी जबाबदारी,” असा बेजबाबदार बाणाही दाखविला, असा टोला खा.डॉ.गावित यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला.

“केंद्र सरकारकडून मिळणारी मदत लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यातही ठाकरे सरकारला अपयश आल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आपत्ती निवारण निधीतून केंद्राने दिलेल्या दोन हजार कोटींच्या निधीतून कोणत्या उपाययोजना केल्या याचा हिशेब जनतेस द्या”, असे आव्हानही त्यांनी दिले.


 

First Published on: November 25, 2021 7:00 PM
Exit mobile version