सैनिकांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर – शरद पवार

सैनिकांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर – शरद पवार

मोदी काय करतील माहित नाही

राज्यकर्त्यांकडून सैनिकांच्या बलिदानाचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. “पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन माझी ५६ इंचाची छाती असल्याचे सांगत होते. मात्र सीमेवर जाऊन जवानांना आधार देत नव्हते. पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, त्या बैठकीत देखील ते उपस्थित नव्हते. ५६ इंचाची छाती असूनही त्यांना राफेलचे कागदपत्रे सांभाळता आली नाहीत, काय करायची ती छाती? आम्ही ५६ इंचाची छाती आहे, असे सांगणार नाही. पण आमच्या मनगटात रग आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार”, अशी भूमिका पवार यांनी व्यक्त केली.

हे वाचा – पुलवामानंतर झालेला एअर स्ट्राईक माझ्या सल्यानुसारच – शरद पवार

राज्यसभेत मी एकटा बस आहे

मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आज चाकण येथे सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी माढातून माघार का घेतली? याबाबतही खुलासा केला. “काही लोक म्हणतात मी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र लोकसभेत नवीन लोक येण्याची गरज आहे. यशवंतराव चव्हाण यांनी मला २६ व्या वर्षी आमदार केले. त्यामुळे आम्हाला देखील नव्या नेतृत्वाची पिढी तयार करावी लागेल, त्यासाठीच पार्थला उमेदवारी दिली आहे. मी सध्या राज्यसभेत आहेच. तिथे मी एकटा बघून घेतो सर्वांना.”

शहीद जवान निनादच्या पत्नीचा निरोप

“नाशिकचे पायलट स्क्वॉड्रन लीडर शहीद निनाद मांडवगणे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी मी भेट दिली होती. तेव्हा त्यांच्या घरच्यांना काही मदत हवी का? असे विचारले. त्यावेळी निनाद यांच्या पत्नी म्हणाल्या की, दिल्लीला सांगा, माझ्या पतीसारखे अनेक जवान देशासाठी बलिदान द्यायला तयार आहेत. मात्र त्यांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थ साधू नका.” असा निरोप निनाद यांच्या पत्नीने मला दिला असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.

संरक्षण मंत्री असतानाची सांगितली आठवण

पवार यांनी स्वतः संरक्षण मंत्री असतानाची एक आठवण सांगितली. “मी संरक्षण मंत्री असताना वीस हजार फुटावर जाऊन सियाचीनला भेट दिली होती. तिथे बर्फाच्या घरात जवान राहतात. मी जाईपर्यंत एकही संरक्षण मंत्री तिथे गेला नव्हता. मलाही जाण्यापासून अधिकाऱ्यांनी त्यावेळी रोखले होते. मात्र आपले जवान तिथे राहू शकतात तर मी का जाऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करत मी गेलो. सियाचीनमध्ये त्या बर्फात महार आणि मराठा रेजिमेंटचे जवान होते. मला पाहिल्यावर त्या जवानांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा ऐकून माझा ऊर भरून आला.”

First Published on: March 17, 2019 9:48 PM
Exit mobile version