विधानसभेत २०० जागा जिंकू – रावसाहेब दानवे

विधानसभेत २०० जागा जिंकू – रावसाहेब दानवे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप २०० जागा जिंकेल आणि राज्यात पुन्हा आमचाच मुख्यमंत्री बसेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांन नागपुरात व्यक्त केला. स्थानिक टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दानवे म्हणाले की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी शिवसेनेशी युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेला ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणे ही आमची लाचारी नव्हे तर तो मैत्रीचा एक भाग आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे दानवे यांनी सांगितले. परंतु, त्याचवेळी त्यांनी राज्यात २०० जागा जिंकून भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल असे भाकितही करून टाकले. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेदरम्यान भाजपच्या बूथप्रमुख योजनेची आकडेवारी मांडली. राज्यात सुमारे ९२ हजार ‘बूथ’ आहेत. यातील ८५ हजारहून अधिक ‘बूथ’वर पक्षाने प्रमुख नेमले आहे असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ अद्यापही भाजपला सर्व ठिकाणी ‘बूथप्रमुख’ नेमता आलेले नाहीत असे त्यांनी सांगितले. दरम्यान राज्य मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल अशी माहिती दानवे यांनी दिली. मात्र अद्याप याबाबतची तारीख निश्चित झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील चित्र सकारात्मक आहे. पहिल्या परीक्षेत सर्वच आमदार उत्तीर्ण झाले आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर निवडणुकीचा मुद्दा नाही

देशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या मागील काही निवडणूकांपासून ‘नोटा’च्या मतांचा भाजपला फटका बसताना दिसतो आहे. याबाबतीत दानवे यांना विचारणा केली असता पुढील निवडणूकीत ‘नोटा’चे प्रमाण निश्चितपणे कमी असेल, असे ते म्हणाले. पुढील निवडणूका आम्ही राममंदिराच्या मुद्द्यावर नव्हे तर विकासाच्या मुद्दयावर लढू. राममंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: October 29, 2018 9:55 PM
Exit mobile version