भाजपची गांधी जयंती फक्त देखावा – अशोक चव्हाण

भाजपची गांधी जयंती फक्त देखावा – अशोक चव्हाण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात कॉंग्रेस आणि भाजपकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, भाजपकडून आयोजन करण्यात आलेले कार्यक्रम हे दिखाऊ असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवाय, गांधीजींच्या विचारांशी भाजपला काहीही घेणेदेणे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रविवारी नागपुरातील देवडिया भवनात कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी भाजपकडून गांधी जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर कडाडून टीका केली. त्यांचे कार्यक्रम हे केवळ देखावे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – मोदी-फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा’


भाजपला संघाचे विचार जवळचे

भाजपला गांधीजींच्या विचारांपेक्षा राष्ट्रीय संवयंसेवक संघाचे विचार जास्त जवळचे असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ‘नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात कुठले विचार पसरविले जातात, हे साऱ्या जगाला माहीत आहे. शिवाय, संघ विचारांशी कधीच एकरुप होऊ शकत नाही. भाजप गांधीजींचे विचार आत्मसात करण्याचा फक्त कांगावा करत आहे. त्यामुळे भाजपने आयोजित केलेले कार्यक्रम हे फक्त देखावा आहेत आणि जनतेला या गोष्टी कळून चुकल्या आहेत’, असेही ते म्हणाले. कॉंग्रेस नेहमी गांधी जयंती निमित्ताने कार्यक्रम करत आले आहे. गांधीजींचे विचार हे कॉंग्रेससाठी नेहमीच श्रद्धास्थानी आहेत. परंतु, भाजप कधीपासून गांधी जयंती साजरी करायला लागले? ते जनतेला सांगावे, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मोदींनी घेतले गांधीजींच्या समाधीचे दर्शन

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्ताने आज देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांनी आज सकाळी राजघाटवर जाऊन गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांना अभिवादन केले.

First Published on: October 2, 2018 11:24 AM
Exit mobile version