आर्थिक संकटात बेस्टला पालिकेचा आधार; ४८२.२८ कोटींची आर्थिक मदत

आर्थिक संकटात बेस्टला पालिकेचा आधार; ४८२.२८ कोटींची आर्थिक मदत

बेस्ट उपक्रम (BEST) एकाबाजूला एकापेक्षा एक आधुनिक सुविधा वीज ग्राहक, बस प्रवासी यांना देत असताना याच बेस्ट उपक्रमाची चाके आर्थिक खड्ड्यात खोलवर रुतत चालली आहेत. अशा या बिकट स्थितीत मुंबई महापालिका पुन्हा एकदा बेस्टच्या मदतीला धावली आहे. बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीसह अन्य देणी अदा करण्यासाठी व भाडे तत्त्वावर काही बसगाड्या घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) तब्बल ४८२.२८ कोटी रुपयांची आर्थिक मदत बेस्ट उपक्रमाला दिली आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचे तब्बल ९० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम ही मुदतठेवींच्या स्वरूपात विविध बँकेत आहे. त्यावर पालिकेला कोट्यवधी रुपयांचे व्याज दरवर्षी मिळते. या व्याजाच्या रकमेतून पालिका अनेक कामे करते. मात्र आता बेस्ट उपक्रमाला तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी पालिकेने मुदतठेवींच्या स्वरूपात बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी २७९ कोटी रुपयांची रक्कम काढली आहे. त्यामध्ये आणखीन २०३.२८ कोटींची रक्कम जोडून पालिकेने ४८२.२८ कोटी रुपयांची रक्कम आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला दिली आहे.

त्यामुळे बेस्टला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मात्र बेस्टला अद्यापही किमान ३ हजार कोटी रुपयांची ठोस मदत जोपर्यन्त मिळत नाही तोपर्यंत बेस्ट आर्थिक संकटातून शंभर टक्के बाहेर येईल, असे वाटत नाही. परंतु मुंबई महापालिकेने ही जी २७९ कोटी रुपयांची रक्कम बेस्टला दिली आहे, त्यामुळे बेस्टच्या डोक्यावरील भार काही प्रमाणात हलका झाला आहे, हे खरे.

मुंबई महापालिकेने गेल्या काही कालावधीत बेस्ट उपक्रमाला अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. बेस्ट उपक्रम पालिकेकडून प्राप्त ४८२.२८ कोटींच्या रकमेतून बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी चुकती करणार आहे. तसेच, काही बस गाड्या भाडे तत्वावर घेण्यासाठी या रकमेचा वापर बेस्ट करणार आहे.


हेही वाचा – कश्मीरी पंडितांच्या हत्येवरून; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

First Published on: June 5, 2022 11:56 AM
Exit mobile version