कुंडलिका खाडीत शिडांच्या होड्यांची स्पर्धा रंगली

कुंडलिका खाडीत शिडांच्या होड्यांची स्पर्धा रंगली

Boat Competition

तालुक्यातील आग्राव येथील प्रसिद्ध असलेल्या कुंडलिका खाडीतील जत्रोत्सव म्हणजे पारंपारिक शिडांच्या होडीची शर्यत हा असतो. या शर्यतीच्या वेळी खाडीत विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जिल्ह्यातून शर्यतप्रेमी हजेरी लावतात. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरात पाडव्याच्या दुसर्‍या दिवशी ही स्पर्धा आयोजित करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या स्पर्धेत सहा स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या शर्यतीमध्ये मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील ‘कमलावती’ या होडीने प्रथम क्रमांक पटकाविला.

दर्यासागर मित्र मंडळ, आग्राव पूर्वपाडा आयोजित स्पर्धा आग्राव जेट्टी येथून सुरू होऊन शिरगाव खाडीत उभ्या असलेल्या पंचांच्या होडीला फेरी मारून रेवदंडा पुलाच्या खाली असलेल्या पंचांच्या बोटीला फेरी मारून पुन्हा आग्राव जेट्टीला या शिडाच्या बोटी येतात. स्पर्धेत दुसरा व तिसरा क्रमांक आग्राव येथील ‘हिरावती’ व ‘लक्ष्मी’ या बोटींनी पटकाविला. विजयी बोटींना अनुक्रमे रोख 40 हजार, 30 हजार व 20 हजार रुपये पारितोषिकांच्या स्वरुपात देण्यात आले.

साधारणपणे एका बोटीत 25 ते 30 तांडेल असतात. या शर्यतीच्या वेळी कुंडलिका खाडीत स्पर्धेत सहभागी नसलेल्या दोनशे ते अडीचशे इतर होड्या असतात. या प्रत्येक होडीत 50 ते 60 शर्यतप्रेमी असतात. ‘उत्सव शिडांच्या होड्यांचा, सण हाय आमच्या कोलीवाड्याचा’ असे फलक लावलेले असतात. यावेळी सर्व होड्यांना विविध रंगाचे झेंडे बांधलेले असतात. त्याचबरोबर होड्यांमध्ये ध्वनीक्षेपक व बेंजो असल्यामुळे गाण्याच्या चालीवर सर्वजण ठेका धरताना दिसत होते.
आग्रावमधील कोळीबांधवांचा हा मोठा सण असल्यामुळे तेथील वातावरण मंगलमय झाले होते. खाडीला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

या शिडांच्या होड्यांची स्पर्धा पाहण्याठी मुंबई, पुणे येथून पर्यटक, नातेवाईक येत असतात. चार-पाच दिवस अगोदर सराव करण्यात येतो. स्पर्धा नियोजनबद्धरित्या पार पाडली जाते. -सिद्धांत लोदीखान, स्पर्धक.

भारावून टाकणार्‍या वातावरणातील शिडांच्या होड्यांची शर्यत म्हणजे एक पर्वणी असते. स्थानिकांच्या होडीत बसून खाडीत जाऊन या शर्यती पाहण्यात फारच मजा येते – प्राची वेळे, पर्यटक.

First Published on: April 9, 2019 4:06 AM
Exit mobile version