Lockdown : रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची बुकिंग झाली हाऊसफुल, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

Lockdown : रेल्वेगाड्यांच्या तिकिटांची बुकिंग झाली हाऊसफुल, लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु, १५ एप्रिल रोजी रेल्वेगाड्यांची ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांनी १५ एप्रिलपासून प्रवासाचे बुकिंग सुरु केले असून जवळपास सर्वच रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्याची स्थिती आहे. परंतु रेल्वे गाड्या सुरु करण्याबाबत कोणतेही आदेश मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळालेले नसून रेल्वेत लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरु केले असले तरी १५ एप्रिलला रेल्वेगाड्या धावतील की नाही, हे निश्चित नाही.

रेल्वेगाड्या १५ एप्रिलला सुरू होणार असून तयार राहा, असा कुठलाही आदेश सध्या मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मिळालेला नाही. नागपूरवरून मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, चेन्नई या चारही दिशांना रेल्वेगाड्या धावतात. या सर्वच रेल्वेगाड्यांतील बुकींग जवळपास फुल्ल झाली असून वेटिंगची स्थिती आहे. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यात १२१३० आझाद हिंद एक्स्प्रेस १२ वेटिंग, ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये आरएसी ३०, १२११४ गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये बर्थ फुल्ल झाले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२८६० गीतांजली एक्स्प्रेस आरएसी ९६, १२१०६ विदर्भ एक्स्प्रेस २७ वेटिंग, १२१४० सेवाग्राम एक्स्प्रेस आरएसी १२, १२८१० हावडा-मुंबई मेलमध्ये आरएसी १४ आहे. जवळपास सर्वच दिशांना जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. पूर्वी रद्द केलेल्या रेल्वेगाड्यांतील प्रवाशांना लॉकडाऊन संपल्यानंतर तिकिटांची रक्कम देण्यात येणार आहे. याशिवाय आणखी लॉकडाऊन केल्यास ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांची तिकिटे आपोआप रद्द होऊन रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

रेल्वे गाड्या सुरु करण्यासाठी कोणतेही आदेश नागपूर विभागाला मिळालेले नाहीत. परंतु ऑनलाईन बुकिंग सुरु आहे. 
– एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

First Published on: April 5, 2020 7:05 PM
Exit mobile version