केंद्राच्या मध्यस्तीनंतरही सीमावादाला पुन्हा हवा, मविआ नेत्यांची पोलिसांबरोबर झटापट

केंद्राच्या मध्यस्तीनंतरही सीमावादाला पुन्हा हवा, मविआ नेत्यांची पोलिसांबरोबर झटापट

कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून केंद्र सरकारने मध्यस्थी करून हा वाद पुन्हा उफाळू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मेळाव्यावरून आज, सोमवारी पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही राज्यांच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (14 डिसेंबर) बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची कानउघाडणी केली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे या जागेवर कोणीही दावा करु नका, असे मंत्री शहा यांनी दोन्ही राज्यांना बजावले. तरीही आज पुन्हा सीमेवर तणाव निर्माण झाला.

महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे बेळगावात मेळावा आयोजित करण्यात आले होते. त्याला सुरुवातीला पोलिसांनी तोंडी परवानगी दिली होती. पण ऐनवेळी या मेळाव्याला लेखी परवानगी नाकारली. याशिवाय खबरदारीच्या उपाययोजना म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकडही करण्यात आली. यात बेळगावच्या महापौरांचाही समावेश आहे. तसेच, मेळाव्यासाठी बांधलेले स्टेजही काढायला लावले. शिवाय, कर्नाटक सरकारने हा मेळावा जिथे होणार होता, त्या व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरात जमावबंदी लागू करत महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला. त्यामुळे बेळगाव आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे, महाविकास आघाडीने आक्रमक होत बेळगावातील महाअधिवेशनास जाण्याचा निर्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संजय पवार आणि विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर दाखल झाले. कोगनाळी टोलनाक्यावर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तिथे महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे आंदोलक आणि मोर्चेकऱ्यांमध्ये थोडीशी झटापटही झाली.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून चंद्रकांत  पाटील आणि  खासदार धैर्यशील माने यांच्यासह आपण सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क शंभूराज देसाई यांनी दिली.

First Published on: December 19, 2022 11:45 AM
Exit mobile version