बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचा भंग ?

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचा भंग ?

ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या मालकीच्या महापौर निवासाचा वापर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठका घेण्यासाठी केला जात आहे. अशा आशयाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आनंद परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्याकरिता सबंध कोकण प्रांतात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मात्र, या आचारसंहिता काळात ठाणे शहरात आचारसंहितेचा भंग केला जात आहे. ठाण्याच्या महापौरांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या ‘महापौर निवास’ मध्ये आचारसंहितेचा भंग केला जात आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून विविध बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे समजते.

अशा पद्धतीने शासकीय वास्तूचा म्हणजेच महापौर निवासाचा वापर करणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून महापौर निवास या वास्तूचा वापर करुन आचारसंहिता भंग केली जात असल्याने आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची चौकशी करावी व संबधितावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत; अन्यथा, ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही आगामी ४८ तासात कारवाई न केल्यास ठामपा आयुक्तांवर लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १२९ (१) अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.

First Published on: January 19, 2023 10:57 PM
Exit mobile version