पाटाला पाणी सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे मागितली लाच; कालवा निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

पाटाला पाणी सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे मागितली लाच; कालवा निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक : शेतीसाठी पाटबंधारे विभागाकडून अविरत पाणी चालू ठेवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना कालवा निरीक्षकासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.२५) श्रीरामपूर शहरात अटक केली. अंकुश सुभाष कडलग (वय ४२, रा.रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर), खासगी व्यक्ती अनिस सुलेमान शेख (३४, रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर), संजय भगवान करडे (३८, रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे महांकाळ वडगांव (ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) येथील आहेत. अंकुश कडलग हे वर्ग तीनचे कालवा निरीक्षक असून, त्यांची नेमणूक वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर येथे आहे. तक्रारदारांच्या सुनेच्या नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडकाकडून मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती 10 वर्षांच्या करार पद्धतीने कसण्यास घेतली आहे. तक्रारदारांनी या क्षेत्रापैकी सध्या 60 एकर ऊस लागवड केली होती. शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते. त्यासाठी दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी भरावी लागते.

तक्रारदारांना जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत 26 हजार 280 रुपये पाणीपट्टी आली होती. पाणीपट्टी तक्रारदार हे शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. त्यानंतर महामंडळातर्फे पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे ६० एकर ऊसाचे क्षेत्र आहे. यापैकी 35 एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन करतात. उर्वरित 25 एकरसाठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात.

अंकुश कडलग यांनी तक्रारदारांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू ठेण्यासाठी ८५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अहमदनगर कार्यालयास दिली. त्यानुसार पथकाने ७ जून २०२३ रोजी लाच मागणी पडताळणी केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान अंकुश कडलग यांनी खासगी व्यक्ती अनिस शेखमार्फत तक्रारदाराकडे ८५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये लाचेची मागणी केली व फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला. त्यानुसार शुक्रवारी (दि. २५) अंकुश कडलग याने तक्रारदारांकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्विकारत संजय करडेकडे दिली. त्यावेळी पथकाने तिघांना अटक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

First Published on: August 26, 2023 6:17 PM
Exit mobile version