Bulli bai Case | या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढू, मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळेंना विश्वास

Bulli bai Case | या प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढू, मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळेंना विश्वास

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून बुल्ली बाई अॅपचं प्रकरण गाजतंय. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिलीय. श्वेता सिंग जिला उत्तराखंडमध्ये अटक झालेली आहे. तिची पाच दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर झालेली आहे. तिसरा आरोपी हासुद्धा उत्तराखंडमधलाच आहे. त्याचीसुद्धा ट्रान्झिट रिमांड होईल. या एकंदरीत प्रकारावरून हा कोणत्याही कटाचा भाग आहे की कसे याबद्दल तपास सुरू आहे. याच्यामध्ये अधिक खोलात तपास करून या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असंही हेमंत नगराळे म्हणालेत.

सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील, असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या App आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. 31 तारखेला या App वर लोड करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा ऍप तसेच ज्या ट्विटर हॅन्डलवरुन या ऍपची माहिती दिली जात होती, त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली. तपास केला. त्यानंतर ‘बुल्ली बाई’ नावाचं ट्विटर हँडलही तयार करण्यात आलं होतं हेदेखील तपासात उघड झालं. ही वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून याच नावानं ट्विटर हॅन्डलही सुरु करण्यात आलं होतं. त्या प्रकरणात महिलांच्या भावना दुखावतील असे कृत्य करण्यात आले. त्या सर्व आरोपींची यात चौकशी केली जाईल आणि त्यांच्या पुढील योग्य ती कारवाई केली जाईल, अशीह माहिती त्यांनी दिलीय.

अशा प्रकारच्या घटना यापुढे होऊ नयेत, यासाठी सायबर पोलीस स्टेशन माध्यमातून सर्व नागरिकांना सूचित करण्यात येईल. तसेच हा सर्व तपास इंटरनेट संबंधित आहे, ऑनलाईन आहे. प्रेस नोटमध्ये जे ट्विटर हँडल ऑपरेट करत होते, त्या प्रकरणात इमेल अॅड्रेस आहे, या प्रकरणात काही माहिती नागरिकांना द्यायची असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्हाला जास्तीत जास्त पुरावे मिळतील, असंही त्यांनी सांगितलंय.

First Published on: January 5, 2022 2:30 PM
Exit mobile version