परवानगीविनाच रंगली बैलगाडा शर्यत; कोरोना नियमही धुळीत

परवानगीविनाच रंगली बैलगाडा शर्यत; कोरोना नियमही धुळीत

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीविनाच नाशिकच्या ओझर येथे माजी आमदार अनिल कदम यांनी शनिवारी (दि.२५) परस्पर बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. सकाळपासून यासाठी जय्यत तयारी सुरू असतानाही पोलीस मात्र दुपारी पोहोचले आणि त्यानंतर काही बैलगाड्या रोखण्यात आल्या. दरम्यान, प्रचंड गर्दीत झालेल्या या शर्यतीत कोरोना नियम मात्र धुळीत गेल्याचे चित्र होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या शर्यतीला कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायद्याला न जुमानता परस्पर अशा शर्यती आयोजित करणाऱ्यांविरुद्ध पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. राज्य सरकारने शुक्रवारी (दि.२४) ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रात्री जमावबंदीचे आदेश लागू करतानाच सोहळ्यांसाठी गर्दीचे निकषही ठरवून दिलेत. त्यानुसार अधिकाधिक २५० व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी असताना, या बैलगाडा शर्यतीसाठी मात्र हजारो व्यक्ती उपस्थित होते. यात कुठेही मास्क किंवा सॅनिटायजेशनचे नियम पाळले गेले नसल्याचं चित्र होतं.

First Published on: December 25, 2021 4:15 PM
Exit mobile version