भुजबळांचे ‘राष्ट्रवादी’तील वजन घटले?

भुजबळांचे ‘राष्ट्रवादी’तील वजन घटले?

भुजबळ यांचा भाजपला टोला

राज्याचे एकेकाळचे हेवीवेटनेते, ओबीसींचे मसिहा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे राज्याच्या राजकीय क्षितिजावर नाशिक जिल्हा कायमच चर्चेत राहिला. मात्र, भुजबळ कारावासातातून बाहेर आल्यापासून त्यांना खुद्द पक्षातूनच आव्हान दिले जाऊ लागले आहे. त्यातच जिल्ह्यातील विधासभा उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेत त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती केल्याने भुजबळांचे पक्षातील वजन घटले की काय अशी चर्चा झडायला सुरुवात झाली आहे.

मुंबईतून राजकीय पुनर्वसनार्थ २००४ मध्ये नाशकात प्रवेश करणारे छगन भुजबळ आणि नाशिक जिल्हा हे जणू एक समीकरणच बनले. नाशिकची राष्ट्रवादी म्हटले की यांच्याविना लहानसाही निर्णय घेऊ शकत नव्हती. राज्याच्या राजकारणात त्यांचे महत्व लक्षात घेता सर्वपक्षीय नेते भुजबळांच्या छत्रछायेखाली विसावले. येवल्याचे प्रतिनिधित्व करताना भुजबळांनी मतदारसंघाच्या विकासात कसूर ठेवली नाही. मात्र, पीए संस्कृती, चौकडी आणि अन्य कारणांमुळे भुजबळांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली. नाशिक लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर व राज्यातील आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भुजबळांच्या अडचणीतही दिवसेंदिवस वाढच होत गेली. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली भुजबळांना सव्वीस महिने तुरुंगवास भोगावा लागला. याकाळात विरोधकांचे फावले. भुजबळ संपले अशी आवईही उठवली गेली, याचा फायदा विरोधकांबरोबर स्वपक्षातील नेत्यांनीही घेण्यास सुरुवात केली. कधी काळी जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांना विचारल्याशिवाय पत्ताही हलत नव्हता. मात्र, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि या लोकसभा निवडणुकीत नाशिककरांनी पुन्हा भुजबळ कुटुंबियांना नाकारले. आता तर त्यांना विधानसभा निवडणुकीत स्वपक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. हे कमी की काय, नांदगाव मतदारसंघात भुजबळ नको म्हणून बैठका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’कडून विधानसभेसाठी पक्षातील इच्छुाकांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. याकरता पक्षाने त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली असून यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आणि मधुकर पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीत भुजबळांचा शब्द प्रमाण असला तरी भुजबळांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आल्याने एक प्रकारे भुजबळांचे पक्षातील वजन घटल्याचेच द्योतक मानले जात आहे.

भुजबळ शिंदेंची मुलाखत घेणार?

भुजबळांना २००४ मध्ये येवल्यातून उमेदवारी करण्याचे आवतन देणार्‍या माणिकराव शिंदे यांनी यंदा भुजबळांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. शिंदे यांनी जाहिरातबाजी करून भुजबळांना थांबण्याचे आवाहन केले आहे. शिंदे यांनी पक्षाकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सर्व इच्छुकांच्या मुलाखती येत्या काही दिवसांत घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मुलाखत घेणार्‍या समितीत भुजबळ यांचा समावेश असून येवल्यातून इच्छा प्रदर्शित करणारे शिंदेंची भुजबळ काय मुलाखत घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published on: July 22, 2019 11:59 PM
Exit mobile version