राज्यात कॅन्सर बळावतोय; २ वर्षांत वाढले रुग्ण!

राज्यात कॅन्सर बळावतोय; २ वर्षांत वाढले रुग्ण!

राज्यात कॅन्सरसारख्या भयानक आजाराचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राष्ट्रीय कर्करोग रजिस्ट्री कार्यक्रमाअंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, २ वर्षात महाराष्ट्रात ११ हजारांनी कॅन्सर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पण, वाढलेल्या जनजागृतीमुळे कॅन्सरच्या रुग्णांचं निदानही लवकर होत आहे. महाराष्ट्रात २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढंच नाही तर कॅन्सरमुळे मृत्यू होण्यातही ४ टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे. देशभरात कॅन्सरच्या रुग्णांच्या आकडेवारीत बिहार आणि उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

जागरूकता वाढू लागलीये…

या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते, कॅन्सरच्या केसेस जरी देशभरात वाढताना दिसत असल्या तरी लोकांमध्ये जागरुकताही वाढत आहे. राष्ट्रीय कर्करोग रजिस्ट्री कार्यक्रमाअंतर्गत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१८ मध्ये सर्वात जास्त २ लाख ७० हजार ५३ केसेस उत्तर प्रदेशमधून, त्यानंतर १ लाख ४५ हजार ५१ रुग्ण बिहार आणि १ लाख ४४ हजार ३२ रुग्ण महाराष्ट्रात आढळले होते. तर, महाराष्ट्रात २०१७ मध्ये १ लाख ३८ हजार २७१ कॅन्सरचे रुग्ण आढळले होते. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, दारु इत्यादी कारणांमुळे लोकं कॅन्सरग्रस्त होत आहेत. २०१७ मध्ये महाराष्ट्रात कॅन्सरमुळे ६९ हजार ८४३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर, २०१८ मध्ये या आकड्यात वाढ होऊन ७२ हजार ७६२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.


हेही वाचा – तंबाखू, मावा, पाणीपुरी तोंडाच्या कॅन्सरचे सोबती

हे लक्षात आलेले रुग्ण?

“या केसेसना वाढलेल्या केसेस न म्हणता लक्षात आलेले रुग्ण असं म्हटलं तर अधिक चांगलं राहीलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत रुग्ण पुढे येत नव्हते. पण, आता वाढलेल्या जनजागृतीमुळे कॅन्सर रुग्णांचं निदान वाढलं आहे”, असं टाटा हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितलं.

एकूणच लोकसंख्या वाढत असल्याने कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. ६० वर्षांच्या वृद्धांची लोकसंख्या वाढत असल्याने तसेच कॅन्सर होण्याची शक्यताही याच आयुर्मानामध्ये अधिक असल्यानेही कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तसेच जीवनशैलीत बदल होणे हे कॅन्सर वाढण्यामागे प्रमुख कारण आहे.

डॉ. श्रीपत बनवली, ज्येष्ठ कॅन्सर तज्ज्ञ

First Published on: June 23, 2019 7:55 PM
Exit mobile version