सेनेने शब्द फिरवला म्हणणे चुकीचे, श्रीमंत शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंचे कान टोचले

सेनेने शब्द फिरवला म्हणणे चुकीचे, श्रीमंत शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंचे कान टोचले

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीच्या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही निवडणूक लढवणार नसल्याचे संभाजीराजेंनी जाहीर केले होते. यावेळी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा गंभीर आरोप शिवसेनेवर केला. यावर संभाजीराजेंचे वडील श्रीमंत शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंचे कान टोचले आहेत.

राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्यासाठीही आमचा विरोध –

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी स्वराज्य संघटना काढली. त्यामुळे स्वबळावर पुढे जाने किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेणे हे दोन पर्याय त्यांच्याकडे होते. मागच्यावेळी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी घेताना ती घेऊ नये असे मत आम्ही मांडले होते. मात्र, त्यांनी तो निर्णय वैयक्तिक घेतला. त्यानंतर आतार्यंत त्यांनी जी राजकीय पाऊले उचलली त्यात कुठेही आमच्याशी अथवा घरच्यांशी त्यांनी चर्चा केलेली नाही. यात छत्रपती घराणे येत नाही. त्यामुळे हा छत्रपती घराण्याचा आपमान आहे, असे म्हणता येणार नाही, असा खुलासा त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केला.

शब्द फिरवला असे म्हणता येत नाही –

संजय पवार यांचे शिवसेनेकडून नाव जाहीर झाले आहे. शाहू महाराजांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले. संजय पवार यांच्यासाख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी देण्याचे काम केले आहे. तो पक्षासाठी अनेक वर्ष झटत होता. त्याचा आनंद आहे, असे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनेने दिलेला शब्द फिरवला असे म्हणता येत नाही असे म्हटले आहे.

मी कधीही त्यांना विरोध केला नाही –

संभाजीराजेंनी २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा पराभव झाला. त्यानंतरची वाटचाल ही व्यक्तिगत आहे. मला किंवा छत्रपती घराण्याला कुठलाही निर्णय विचारून घेतला नाही. मी कधीही त्यांना विरोध केला नाही. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते व्यक्तिगत आहेत. राजकीय संघटना काढून त्यांना पुढे जायचे असेल तर त्यांना शुभेच्छा आहे. पक्ष स्थापन केला असेल तर त्यांना राजकारण जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना खासदारकी हवी होती असे यावेळी शाहू महाराज यांनी सांगितले.

First Published on: May 28, 2022 4:16 PM
Exit mobile version