कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट घोट नदीत पडली

नवी मुंबईतल्या घोट नदीमध्ये कार कोसळली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतिही जिवितहानी नाही झाली. सोमवारी दुपारच्या सुमारास कारचा कंट्रोल सुटल्याने कार थेट नदीमध्ये पडली. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते. या चारही जणांची स्थानिक गावकऱ्यांनी सुखरुप सुटका केली.

कारवरील नियंत्रण सुटले

मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासमुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. नवी मुंबईतली तळोजा येथील घोट नदीला देखील पूर आला आहे. सोमावारी दुपारी शेख कुटुंबिय वावंजे गाव येथून तळोजा फेज येथे जात होते. दरम्यान त्यांची कार घोटगाव नदीच्या पुलावर आली असता कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीमध्ये जाऊन पडली. सुदैवाने कार दगडामध्ये अडकली. या गाडीमधून चार जण प्रवास करत होते.

स्थानिक नागरिकांनी वाचवला जीव

कार नदीमध्ये पडल्यानंतर गाडीमध्ये असणारे चार जण गाडीच्या टपावर आले. अपघाताची माहिती मिळताच गावाकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीला पूर आल्यामुळे या चौघांना वाचवणे खूप कठीण होते. मात्र तरी देखील लहू पाटील , लक्षमन धुमाळ, तुळशीराम निघुकर, रुपेश पाटील या स्थानिक नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून नदीमध्ये उतरले. त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने गाडीतील चारही जणांची सुखरुप सुटका केली. शेख कुटुंबियांवर वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता त्यामुळे सर्वांचा जीव वाचला.

तळोजा पोलिसांकडून तपास सुरु

या कारमधून अशरफ शेख (३७ वर्ष), त्यांची पत्नी हमीदा शेख (३३ वर्ष), मुलगी सुहाणा शेख (७ वर्ष) आणि पुती नमीरा शेख (१७ वर्ष) हे प्रवास करत होते. अपघाता दरम्यान त्यांना किरकोळ जखम झाली असून त्यांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. अपघातानंतर कारला देखील नदीमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान याप्रकरणी तळोजा पोलीस तपास करत आहेत.

First Published on: July 16, 2018 8:45 PM
Exit mobile version