रस्ता ओलांडणार्‍या मुलीला वाचवताना कार पलटी; एकाचा जागीच मृत्यू, ८ गंभीर

रस्ता ओलांडणार्‍या मुलीला वाचवताना कार पलटी; एकाचा जागीच मृत्यू, ८ गंभीर

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या कार अपघातात एक प्रवाशी जागीच ठार, तर मुलीसह आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (दि.१८) डोळासणे शिवारात हा अपघात झाला. कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार जागेवरच उलटली.

डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे अस्थी विसर्जन करून नारायणगाव येथील डेरे कुटुंब कारमधून (एमएच-14, केबी-8714) नाशिक-पुणे महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घराकडे परतत होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी (डोळासणे) शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडाझुडपांतून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर आली. त्यावेळी कारचालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी कारचा अचानक ब्रेक दाबला. कार भरधाव वेगात असल्याने ब्रेक दाबताच कार पाच ते सहावेळा उलटून 500 मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन थांबली. यात कारचे टायर फुटून मोठे नुकसान झाले.

अपघातात कारमधील विजय शंकर डेरे (वय 62, रा. नारायणगाव, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला. तर, रोहित विजय डेरे (वय 23), उज्ज्वला विजय डेरे (वय 48), मोहित विजय डेरे (वय 30), सविता अनिल शेटे (वय 48), शैला दिलीप वारुळे (वय 58), विनायक शिवाजी डेरे (वय 50, सर्व रा. नारायणगाव, पुणे), शोभा दशरथ वायाळ (वय 54, रा. नांदूर, नाशिक) यांच्यासह रस्ता ओलांडणारी शाळकरी मुलगी वैष्णवी विश्वास मेंगाळ (वय 12, सध्या रा. बाळेश्वर आश्रमशाळा, सारोळे पठार, मूळ गाव रा. पाटगाव आळेफाटा, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हवालदार अरविंद गिरी, पोलीस नाईक नंदकुमार बर्डे, भरत गांजवे, योगीराज सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. अपघातादरम्यान बराच काळ वाहतूक खोळंबली होती.

First Published on: November 19, 2022 10:17 PM
Exit mobile version