Coronavirus : भाजपच्या नगरसेवकाला मॉर्निंगवॉक पडले महागात!

Coronavirus : भाजपच्या नगरसेवकाला मॉर्निंगवॉक पडले महागात!

राज्यात कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तसेच कोरोनाला हरवायचे असेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने मोठी हद्द केली आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या नियमांना धाब्यावर बसवून भाजप नगरसेवकाने थेट मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचा प्रताप केला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी त्यांना चांगलीच अद्दल घडविली आहे.

भाजप नगरसेवकासह १७ जणांवर गुन्हा दाखल

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आडकाठी आणणाऱ्या नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी रविवारी जोरदार हिसका दाखविला आहे. पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृहनेते रवींद्र इथापे यांच्यासह १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पनवेलमध्ये भाजपच्या नगरसेवकाची वाढदिवसाची पार्टी वादग्रस्त ठरलेली असताना आता पुन्हा नेरुळमधील भाजपच्याच नगरसेवकाचा मॉर्निंग वॉकचा कारनामा उघडकीस आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग सिल करण्यात आले असून नागरिकांवरील निर्बंध कडक करण्यात येत आहेत.

किराणा स्टोअर्स ५ नंतर बंद

एपीएमसीचे मार्केट तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर शहरातील सर्वच किराणा स्टोअर्स बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. प्रशासकीय पातळीवर इतकी सावधगिरी बाळगली जात असताना रविवारी १७ जण बेलापूर परिसरातील पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी गेले. त्यामध्ये भाजपचे नगरसेवक आणि विद्यमान सभागृह नेते रवींद्र इथापे यांचाही समावेश होता. या मॉर्निंग वॉकची माहिती मिळाल्यानंतर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी तातडीने पारसिक हिलवर धाव घेतली आणि सर्वांची उचलबांगडी करुन त्यांना पोलीस ठाण्यात आणले असून या सर्वांवर साथीचे रोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे चोरून मॉर्निंग वॉक करणारांचे आणि विनाकारण रस्त्यावर फिरणारांचे दाबे चांगलेच दणाणले आहेत.

आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवा!

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वांची एकच मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे फक्त घरात राहण्याची. सर्व नागरिकांसह लोकप्रतिनिधींही या जबाबदारीची जाणीव ठेवावी. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. अन्यथा पोलिसांना नाईलाजास्तव गुन्हे दाखल करावे लागतील, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.

First Published on: April 13, 2020 12:32 PM
Exit mobile version